कोल्हापुरात एकाने थुंकीमुक्त कार्यकर्त्यास मारहाण केली, पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 11:47 IST2025-02-05T11:45:27+5:302025-02-05T11:47:10+5:30
पाहुणचार होताच सूर बदलला

कोल्हापुरात एकाने थुंकीमुक्त कार्यकर्त्यास मारहाण केली, पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली
कोल्हापूर : रस्त्यावर थुंकू नका, असे सांगणाऱ्या थुंकीमुक्त कोल्हापूर चळवळीतील कार्यकर्त्यास मारहाण करणारा रितेश गणेश मछले (वय २८, रा. मोतीनगर, राजेंद्रनगर, कोल्हापूर) याला राजारामपुरी पोलिसांनी अद्दल घडवली. पोलिसांचा प्रसाद मिळताच मछले याने हात जोडून माफी मागितली. तसेच कोल्हापूर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. आधी दमदाटी आणि नंतर हात जोडून माफी मागणारा त्याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे.
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सुरू झालेली थुंकीमुक्त कोल्हापूर चळवळ हळूहळू वाढत असताना, त्याला खो घालणाऱ्या काही नतदृष्टांचाही सामना चळवळीतील कार्यकर्त्यांना करावा लागत आहे. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास जवाहरनगर येथील पेट्रोल पंपाजवळ थांबलेले काही तरुण रस्त्यावर थुंकीच्या पिचकाऱ्या मारत होते. त्यावेळी थुंकीमुक्त चळवळीतील कार्यकर्ते बृहस्पती हिरभाऊ शिंदे (वय ४८, रा. सम्राटनगर, कोल्हापूर) यांनी तरुणांना रस्त्यावर थुंकू नका, असे सांगितले. याचा राग आल्याने रितेश मछले याने शिंदे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. काय करायचे ते कर, कुठेही तक्रार कर, आम्ही कुणाचे ऐकणार नाही, असे म्हणत तो दमदाटी करीत होता. याबाबत शिंदे यांनी सोमवारी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पाहुणचार होताच सूर बदलला
फिर्यादी शिंदे यांनी मोबाइलवर केलेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी रितेश मछले याला मंगळवारी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चूक कबूल करीत पुन्हा असा प्रकार करणार नसल्याची ग्वाही दिली. तसेच थुंकीमुक्त कोल्हापूर चळवळीसाठी सगळ्यांनी योगदान देण्याचे आवाहन केले.