सत्तारूढ महायुतीला कोल्हापूर जिल्ह्यात धक्क्यांवर धक्के, ‘बी’ प्लॅन काय याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 04:09 PM2024-08-22T16:09:30+5:302024-08-22T16:12:35+5:30

भाजपची अवस्था ‘धोबी का..’

The political situation in Kolhapur district worsened due to the resignation and role of the leader in the MahaYuti | सत्तारूढ महायुतीला कोल्हापूर जिल्ह्यात धक्क्यांवर धक्के, ‘बी’ प्लॅन काय याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

सत्तारूढ महायुतीला कोल्हापूर जिल्ह्यात धक्क्यांवर धक्के, ‘बी’ प्लॅन काय याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार असताना आदल्या दिवशीच महायुतीला धक्क्यांवर धक्के बसले आहेत. यातून महायुती कशी सावरणार आणि त्यासाठीचा ‘बी’ प्लॅन काय करणार याकडेच आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्यचे संस्थापक आमदार विनय कोरे यांनी पहिला बॉम्ब टाकून करवीर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्याविरोधात संताजी घोरपडे यांची उमेदवारी जाहीर केली. आणखी एक घटक पक्ष असलेल्या ताराराणी आघाडीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी चिरंजीव राहुल आवाडे यांची अपक्ष उमेदवारी जाहीर करून दुसरा दणका दिला. याचदरम्यान भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन ‘तुतारी’ घेण्याची तयारी केली असून, ते आता थांबण्याच्या मनस्थितीत नाहीत.

याचदरम्यान भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, दुसरीकडे अजित पवार गटाचे खंदे पदाधिकारी ए. वाय. पाटील यांनी प्रदेश उपाध्यक्ष पदासह, सदस्यपदाचाही राजीनामा बुधवारी दिला. इचलकरंजी, करवीर, राधानगरी आणि कागल अशा चार विधानसभा मतदारसंघांत महायुतीला हे धक्के बसले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नसतानाही राजकीय हालचाली वेगावल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने इंडिया आघाडीने कोल्हापूर जिल्ह्यात नेत्रदीपक कामगिरी केली आहे त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या विरोधकांनी जोडण्या घालायला सुरुवात केली आहे. या राजीनामासत्रामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके या महायुतीच्या उमेदवारांसमोरील अडचणी वाढू शकतात.

आवाडे यांनी सुरुवातीला निवडून आल्यानंतर भाजपला पाठिंबा दिला होता; परंतु आता ते अपक्ष लढणार असल्याचे सांगत असून त्यांच्याबाबतीत भाजप काय निर्णय घेणार किंवा विनय कोरे यांना कशा पद्धतीने थांबवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आवाडे यांना भाजप अजून आतच घ्यायला तयार नाही. इचलकरंजीचा भाजप हा आवाडे यांच्यामुळे नव्हे, तर मूळच्या भाजपच्या कार्यकर्त्यांमुळेच असल्याची स्थानिकांची भावना आहे.

फडणवीस यांचा महाडिक यांना फोन

समरजित घाटगे यांच्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार धनंजय महाडिक यांना बुधवारी फोन केला. त्यानुसार त्यांनी दिलेला निरोप आपण घाटगे यांना देण्यासाठी भेटणार आहोत, अशी माहिती महाडिक यांनीच पत्रकारांना दिली. नाथाजी पाटील यांच्या नियुक्तीनंतर राहुल देसाई यांनी राजीनामा दिला आहे; परंतु त्यांना नवी जबाबदारी देण्यात येणार असून ते आज महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित राहतील असा दावाही महाडिक यांनी केला आहे.

भाजपची अवस्था ‘धोबी का..’

कोल्हापूर जिल्हा भाजपची अवस्था ‘धोबी का कुत्ता घर का न घाट का’ अशी आज झाली असल्याची टीका ‘उबाठा’चे शहरप्रमुख सुनील मोदी यांनी पत्रकात केली आहे. त्यात ते म्हणतात, सत्तेचे आमिष दाखवून जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीसह अन्य पक्षांतील नेत्यांना पक्षात घेतले. व मूळ भाजपच्या लोकांना घरी बसवले. आज हेच बाहेरून आलेले नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. कारण ज्या उद्देशाने पक्षात आले होते तो उद्देश सफल होत नाही, हे लक्षात आल्यावर ते अन्य पक्षांत जात आहेत.

ज्या मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरचे म्हणून ओळखले जाते, त्यांना कोल्हापूर जिल्हा खऱ्या अर्थाने कधी कळलाच नाही, हे भाजपचे दुर्दैव आहे. आता मात्र निष्ठावंतांची आठवण भाजप नेतृत्वाला होत आहे, म्हणूनच नाथा पाटीलसारख्या कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्ष केले जाते. स्वत:चा स्वार्थ साधणारे अनेकजण काही दिवसांत भाजप सोडून गेले तर आश्चर्य वाटायला नको.

Web Title: The political situation in Kolhapur district worsened due to the resignation and role of the leader in the MahaYuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.