निवडणुकांत भाऊ माझा पाठीराखा, कोल्हापूर जिल्ह्यात सतेज पाटील, प्रकाश आबिटकरांसह 'या' नेत्यांना बंधूंचे पाठबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 05:11 PM2024-10-31T17:11:18+5:302024-10-31T17:12:56+5:30
पोपट पवार कोल्हापूर : एकीकडे भारतातील आदर्श कुटुंबव्यवस्थेची वीण पूर्णपणे सैल होऊ लागली असताना दुसरीकडे राजकारणातील काही घराण्यांनी मात्र ...
पोपट पवार
कोल्हापूर : एकीकडे भारतातील आदर्श कुटुंबव्यवस्थेची वीण पूर्णपणे सैल होऊ लागली असताना दुसरीकडे राजकारणातील काही घराण्यांनी मात्र ही वीण अधिक घट्ट बांधत कुटुंबातील एकाच व्यक्तीच्या पाठीशी आपली ताकद उभी केली आहे. माझ्यापेक्षा तू कसा मोठा होतो म्हणत रक्ताची नाती एकमेकांना पाण्यात पाहत असताना जिल्ह्यातील काही भावांनी मात्र आपल्या दुसऱ्या भावासाठीच आपली ताकद खर्ची घातली आहे.
आमदार सतेज पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह काही नेत्यांचे राजकारण त्यांच्या बंधूंच्या भक्कम पाठबळावर उभे आहे. पडद्यामागून सुत्रे हलवणारे हे बंधूच या नेत्यांसाठी सर्वात मोठा आधार ठरत आहेत.
संजय पाटील-सतेज पाटील बंधुप्रेम
काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्या राजकारणाला त्यांचे मोठे बंधू डॉ. संजय डी. पाटील यांचे सर्वात मोठे पाठबळ आहे. राजकारणाच्या कोणत्याही आखाड्यात संजय पाटील येत नसले तरी पडद्यामागून सर्व जोडण्या लावण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. सध्या सतेज पाटील हे राज्यस्तरावरील नेतृत्व म्हणून पुढे आले आहे. त्यांच्या करवीर विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय करिअरपासून ते काँग्रेसचे राज्यातील आश्वासक नेतृत्व इथंपर्यंतच्या प्रवासात संजय पाटील त्यांच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहिले आहेत.
आबिटकर बंधूंची एकी
राधानगरी मतदारसंघातून सलग दोनवेळा गुलाल घेतलेले प्रकाश आबिटकर यांच्या राजकारणाला त्यांचे बंधू अर्जुन आबिटकर यांनी खऱ्या अर्थाने बुस्टर दिला आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य असलेले अर्जुन आबिटकर हे मतदारसंघातील नागरिकांना भेटण्यापासून त्यांच्या स्थानिक समस्या सोडवण्यापर्यंत पुढाकार घेत असतात. विजयासाठीच्या पडद्यामागील जोडण्याही तेच लावतात.
यड्रावकर बंधूचे प्रेम
शिरोळ मतदारसंघातून महायुतीकडून रिंगणात उभे असलेले आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे राजकारण त्यांचे लहान बंधू संजय यांच्यावर तरले आहे. जयसिंगपूर नगरपालिका, शेतकरी सूतगिरणी यासह तालुक्यातील यड्रावकर गटाच्या राजकारणाची भिस्त संजय यांच्यावरच आहे. राज्यमंत्रिपदही त्यांनीच खेचून आणले आहे. संजय म्हणजे माझा 'लक्ष्मण' आहे असे राजेंद्र पाटील अभिमानाने सांगत असतात.
नरके यांना बंधूंची साथ
करवीरच्या राजकारणात चंद्रदीप नरके यांना त्यांचे बंधू अजित नरके हे सावलीसारखे साथ देत आहेत. गावगाड्यातील स्थानिक कार्यकर्त्यांशी अजित नरके यांचा चांगला संपर्क आहे.