कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या ४२ लाख, पोलिस अवघे २७००; कामाचा प्रचंड ताण 

By उद्धव गोडसे | Published: December 18, 2023 01:12 PM2023-12-18T13:12:00+5:302023-12-18T13:21:04+5:30

उद्धव गोडसे कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ४२ लाख एवढी आहे. जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी अवघ्या २७०० पोलिसांकडे ...

The population of Kolhapur district is about 42 lakhs, Police only 2700, work load increased | कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या ४२ लाख, पोलिस अवघे २७००; कामाचा प्रचंड ताण 

कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या ४२ लाख, पोलिस अवघे २७००; कामाचा प्रचंड ताण 

उद्धव गोडसे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ४२ लाख एवढी आहे. जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी अवघ्या २७०० पोलिसांकडे आहे. वाढती गुन्हेगारी, मोर्चे, आंदोलने, अतिविशेष व्यक्तींचे दौरे आणि सततचे बंदोबस्त यामुळे पोलिसांवरील कामाचा ताण कमालीचा वाढला आहे. परिणामी, त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या आठवड्यात दोन अधिकाऱ्यांना आलेले हृदयविकाराचे झटके हा त्याचाच परिणाम असल्याचे दिसत आहे.

पोलिसांचे काम आता पूर्वीसारखे निवांतपणाचे राहिले नाही. दहा ते बारा तासांची ड्युटी, पोलिस ठाण्यातील कामांचा वाढता ताण, प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा करणे, कोर्टातील वाऱ्या, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव आणि नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा यामुळे पोलिसांची मानसिक आणि शारीरिक कुचंबणा होत आहे. याचे परिणाम पोलिसांच्या आरोग्यावर होताना दिसत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यात याची तीव्रता वाढली आहे. प्रलंबित गुन्ह्यांची निर्गत करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. यातच विविध प्रकारची आंदोलने, सण-समारंभ, मंत्र्यांचे दौरे, सोशल मीडियातील आक्षेपार्ह मेसेजमुळे उद्भवणारे धार्मिक तणावाचे प्रसंग पोलिसांच्या कामात भर घालत आहेत. ऐनवेळी लागणाऱ्या कामांमुळे हातचे काम सोडून पोलिसांना पळावे लागले. परिणामी, मूळ कामे रखडत असल्याने वरिष्ठांची बोलणी खावी लागतात. वरिष्ठांना योग्य उत्तर दिले नाही तर कारवाईची टांगती तलवार असते, त्यामुळे पोलिस दलात अस्वस्थता आहे.

निलंबनाची भीती

पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून पोलिस दलातील कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्रुटी आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही चौकशा लावल्या आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण, आर्थिक गुन्हे अन्वेषण अशा महत्त्वाच्या शाखांमधील कर्मचाऱ्यांवर कारवाया केल्या आहेत. यामुळे वरिष्ठांच्या तावडीत सापडल्यास निलंबनाची कारवाई होऊ शकते, अशी भीती कर्मचाऱ्यांच्या मनात आहे.

तणावाचे व्यवस्थापन आवश्यक

मानसिक ताणतणावांचा परिणाम आरोग्यावर होऊ नये, यासाठी तणावाचे व्यवस्थापन करता येणे गरजेचे आहे. कोणत्या कामांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो किंवा वाढू शकतो याचा अंदाज घेऊन ती कामे प्राधान्याने आणि चोख पद्धतीने केली जावीत. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद आणि समन्वय ठेवून काम केल्यास तणाव कमी होतो, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ कालिदास पाटील यांनी दिला.

बंदोबस्त वाढले

सण-समारंभ, मंत्र्यांचे दौरे, जातीय दंगली, ऊस दर आंदोलन, आरक्षण मागणीची आंदोलने यामुळे पोलिसांना बंदोबस्त तैनात करावा लागतो. त्यात बरेच मनुष्यबळ अडकून पडते. काहीवेळा बाहेरच्या जिल्ह्यातही बंदोबस्तासाठी जावे लागते. याच पोलिसांना त्यांच्याकडील अन्य कामांचाही निपटारा करावा लागतो मात्र, त्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. यातच वरिष्ठांकडून दबाव वाढत राहतो, त्यामुळे पोलिसांची मानसिकता बिघडते.

असा करा ताण हलका

  • नियमित व्यायाम आणि आहाराकडे लक्ष द्या
  • वरिष्ठांचे आदेश आणि प्राधान्य क्रमानुसार कामांचे नियोजन करा
  • कामात चुका राहू नयेत, याची खबरदारी घ्यावी
  • अशक्य किंवा वेळ लागणाऱ्या कामांबद्दल स्पष्ट बोलावे
  • वरिष्ठ आणि सहकाऱ्यांसोबत संवाद असावा
  • कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवावे

Web Title: The population of Kolhapur district is about 42 lakhs, Police only 2700, work load increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.