Kolhapur Crime: निवारा ट्रस्टच्या तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, कोणत्याही क्षणी अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 02:03 PM2023-05-09T14:03:45+5:302023-05-09T14:04:11+5:30

ठेवीदारांनी दाखल केलेल्या फिर्यादीनंतर फसवणुकीचे २२ लाख ३७ हजार रुपये न्यायालयात जमा करण्याचे आश्वासन संशयितांनी न्यायाधीशांसमोर दिले होते. प्रत्यक्षात मात्र मोबाइल बंद करून गायब

The pre-arrest bail application of Nivara Trust Pooja Ajit Bhosale-Joshi was rejected | Kolhapur Crime: निवारा ट्रस्टच्या तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, कोणत्याही क्षणी अटक

Kolhapur Crime: निवारा ट्रस्टच्या तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, कोणत्याही क्षणी अटक

googlenewsNext

कोल्हापूर : साडेचार हजार ते सहा हजार ट्रस्टसाठी भरून घेऊन १८ महिन्यात २६ लाख रुपये देण्याचे गिफ्ट डीड करून फसवणूक करणाऱ्या तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांनी सोमवारी (दि. ८) फेटाळला.

यामुळे संशयित पूजा अजित भोसले-जोशी (रा. सिल्व्हर आर्च अपार्टमेंट, राजारामपुरी तिसरी गल्ली, कोल्हापूर), राहुल रमेश भोसले (रा. पूजाप्रिया अपार्टमेंट, उचगाव, ता. करवीर) आणि भरत श्रीपती गाठ (मूळ रा. हुपरी, सध्या रा. यड्राव रोड, इचलकरंजी) या तिघांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

निवारा टेस्टामेंटरी ट्रस्ट व एनजीओ या ट्रस्टने २६ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच ट्रस्टची प्रमुख पूजा भोसले-जोशी हिच्यासह तिघांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत न्यायाधीशांनी संशयितांनी ८ मे पर्यंत २२ लाख ३७ हजार रुपयांची रक्कम जमा करण्याचे आदेश दिले होते. तसेच काही अटी-शर्थींनुसार संशयितांना ८ मेपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते.

मात्र, संशयित सोमवारी न्यायालयाकडे फिरकलेच नाहीत. वकिलांकरवी बाजू मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संशयितांचा अटकपूर्व जामीन न्यायाधीश तांबे यांनी फेटाळला. या निर्णयामुळे तिन्ही संशयितांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. सरकार पक्षाच्या वतीने ॲड. अमित महाडेश्वर यांनी काम पाहिले. फिर्यादींच्या वतीने ॲड. स्नेहा माळी व बाबा इंदुलकर यांनी बाजू मांडली.

पूजा भोसले-जोशी गायब

ठेवीदारांनी दाखल केलेल्या फिर्यादीनंतर फसवणुकीचे २२ लाख ३७ हजार रुपये न्यायालयात जमा करण्याचे आश्वासन संशयितांनी न्यायाधीशांसमोर दिले होते. प्रत्यक्षात मात्र पूजा भोसले-जोशी तिचे मोबाइल बंद करून गायब झाली आहे, अशी माहिती तपास अधिकारी सुनीता शेळके यांनी दिली.

आणखी १५१ ठेवीदारांची तक्रार

निवारा ट्रस्टच्या विरोधात आणखी १५१ ठेवीदारांनी प्रजासत्ताक आणि कॉमन मॅन संघटनेकडे धाव घेतली. ठेवीदारांच्या वतीने ॲड. इंदुलकर यांनी सोमवारी न्यायालयात तक्रार दाखल केली. संशयितांचा जामीन अर्ज फेटाळून त्यांच्यावर अटकेची कारवाई व्हावी, तसेच त्यांनी तयार केलेल्या बनावट ठेव पावत्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी न्यायालयात केली.

Web Title: The pre-arrest bail application of Nivara Trust Pooja Ajit Bhosale-Joshi was rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.