कोल्हापुरात पावसाळ्यापूर्वी केलेले पॅचवर्क गेले वाहून, मुरमाच्या पॅचवर्कमुळे रस्त्यांवर चिखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 02:00 PM2023-07-21T14:00:10+5:302023-07-21T14:00:28+5:30
कामातील दर्जा पुन्हा आला समोर
कोल्हापूर : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहराच्या अनेक भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले असून ठिकठिकाणी पाणी साचून राहिलेले आहे. महापालिका सार्वजनिक बांधकाम व आरोग्य विभागाने गुरुवारी दिवसभर मुरूम टाकून खड्डे भरण्यास सुरुवात केली तर रस्त्यावर साचून राहिलेल्या पाण्याला वाट करून देण्याचा प्रयत्न केला.
महापालिका बांधकाम विभागाने यावर्षी पॅचवर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु नेहमीच्या अनुभवानुसार ही पॅचवर्कची कामे दर्जेदार झाली नाहीत. यावर्षीच्या पहिल्याच पावसात ही पॅचवर्क उखडले आहेत. आईसाहेब महाराज पुतळ्यापासून ते बिंदू चौक माधुरी बेकरीपर्यंतचा रस्त्यावरील पॅचवर्क खराब झाली आहेत. अशीच परिस्थिती लुगडी ओळ रस्त्याची झाली आहे.
गोखले कॉलेज ते रेणुका मंदिर चौक तसेच हॉकी स्टेडियम जवळील चौकात खड्डे पडले आहेत. रेणुका मंदिर चौकात येणाऱ्या पाण्याचा लवकरच निचरा होत नसल्याने तेथील आधी केलेले पॅचवर्क उखडून गेले आहेत. साने गुरुजी वसाहत रस्त्यावरून पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत थेट क्रेशर चौकात येते. त्यामुळे या चौकातील पॅचवर्क पार धुवून गेल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. रंकाळा टॉवर चौकातही असेच खड्डे पडलेले आहेत.
मिरजकर तिकटी चौक ते पाण्याचा खजिना हा रस्ता तर आता पाणंद रस्ता झाला आहे. या रस्त्यावर जलवाहिनी, ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी खुदाई करण्यात आली होती. त्याचे पुनर्पृष्ठीकरण वेळेत न केल्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. पाण्याच्या खजिन्यापासून ते संभाजीनगर पर्यंतही रस्त्यावर लहान मोठे खड्डे पडले आहेत. संभाजीनगर येथे रस्त्यावरच पाणी साचून राहिते. पाणी जाण्यास तेथे वाव नाही.
दरम्यान, गुरुवारी महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे चारही विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत सर्वच रस्त्यावरील खड्डे मुरूम टाकून बुजविण्यास सुरुवात केली आहे. परंतु मुरूम टाकल्याने तत्काळ खड्डा भरतो, परंतु नंतर पावसाच्या पाण्याने त्यावर चिखल तयार होत आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर साचून राहणाऱ्या पाण्याला वाट करून देण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी छोट्या चरी काढून पाण्याला वाट करून दिली जात आहे.
ड्रेनेज लाइन चोकअप
पावसाळ्यात ड्रेनेज लाइन चोकअप होण्याचा नेहमीचा अनुभव यंदाही येत आहे. जेट मशीनची कमतरता असल्याने पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्वच ड्रेनेज लाइन स्वच्छ करता आलेल्या नाहीत. परिणामी ठिकठिकाणी त्या तुंबल्याने रस्त्यावर मैलामिश्रित सांडपाणी वाहत आहेत.