आताचे राज्यकर्ते म्हणतात लुटा, पण आमचा वाटा टाका; राजू शेट्टींचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 12:23 PM2023-09-25T12:23:26+5:302023-09-25T12:24:36+5:30
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज त्याकाळी रयतेच्या बांधावरील गवताच्या काडीलाही धक्का लागू नये, याची काळजी घेत असत. मात्र आता ...
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज त्याकाळी रयतेच्या बांधावरील गवताच्या काडीलाही धक्का लागू नये, याची काळजी घेत असत. मात्र आता महाराज यांचे नाव घेऊन कारभार करणारे राज्यकर्ते जनतेला लुटा; पण आमचा वाटा टाका असे म्हणत आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी केली.
येथील मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळाच्या मराठा साम्राज्याच्या आरमार प्रमुखांच्या कार्य आणि शौर्यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या ‘सरखेल कान्होजी आंग्रे दर्यासागर’ या सजीव देखाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शाहू छत्रपती, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष उद्योजक व्ही. बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी खासदार शेट्टी म्हणाले, लेटेस्ट तरुण मंडळ डॉल्बीशिवाय गणेशोत्सव साजरा करते. मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रम साजरे केले जातात. या मंडळाचा आदर्श इतर मंडळांनीही घेतला पाहिजे. मंडळात देखाव्याच्या माध्यमातून कल्पकता आणि कलेला वाव दिला जातो, हे कौतुकास्पद आहे.
शाहू छत्रपती म्हणाले, लेटेस्ट तरुण मंडळ डॉल्बी न लावता गणेशोत्सव साजरा करते. विविध सामाजिक कामातही आघाडीवर आहे. उद्योजक पाटील म्हणाले, लेटेस्ट तरुण मंडळ सामाजिक भान ठेवून सातत्याने सामाजिक कार्यात आघाडीवर असते.
मंडळाचे अध्यक्ष यादव यांनी मंडळाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी उद्योजक नितीन दलवाई, कविता पोवार, सरदार पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. कार्यक्रमास उत्सव प्रमुख केदार सूर्यवंशी, अनिल ढवण, अजित पोवार आदी उपस्थित होते.
पुढील वर्षी शेट्टी, व्ही.बी. यांनी खासदार होऊन यावे
राजू शेट्टी आणि व्ही.बी. पाटील यांनी पुढील वर्षी आमच्या मंडळाच्या कार्यक्रमास खासदार होऊन यावे, अशी अपेक्षा मंडळाचे अध्यक्ष गजानन यादव यांनी व्यक्त केली. याला उपस्थित श्रोते, प्रेक्षकांनी दाद दिली.
शेट्टी यांच्यामुळे उसाला चांगला दर
शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यामुळे उसाला चांगला दर मिळतो, असे कौतुक शाहू छत्रपती यांनी केले. व्ही. बी. पाटील आता चांगलेच सक्रिय झाले आहेत. शेट्टी आणि व्ही. बी. चांगले काम करीत आहेत. पुढील काळातही दोघांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.