मशागतीसाठी शेतकऱ्यांची धावाधाव; रोटर, बैलांच्या औतालाही वेटिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 03:55 PM2024-05-29T15:55:58+5:302024-05-29T15:56:19+5:30
मान्सून उंबरड्यावर आल्याने शेतकऱ्यांची खरीप पेरणी तयारीची लगबग
कोल्हापूर : मान्सून उंबरड्यावर आल्याने शेतकऱ्यांची खरीप पेरणी तयारीची लगबग वाढली आहे. मशागतीची कामे एकदम सुरू झाल्याने ग्रामीण भागात रोटर, बैलांचे औतासाठी वेटिंगवर थांबावे लागत आहे. बैलांची संख्या फारच कमी झाल्याने छोट्या, मोठ्या रोटरना खूपच मागणी वाढली आहे. रोटरच्या त्याच्या मालकावर अवलंबून असल्याने प्रत्येक गावात वेगवेगळे दर पाहावयास मिळतात. बैलांचे औत काहीसे महागले आहे.
यंदा मान्सून अंदमान निकोबारमध्ये वेळेवर दाखल झाला असून तो गतीने पुढे सरकत आहे. साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात तो तळकोकणातून कोल्हापुरात दाखल होईल, असा अंदाज आहे. त्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून पावसाचे वातावरण राहिल्याने शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. उन्हाळी पिके काढून खरिपासाठी जमिनी तयार करण्यासाठी घाई सुरू झाली आहे. बांध धरणे, नांगरट करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे; पण मशागतीसाठी बैलांचे औत, रोटर वेळेत मिळेनात.
बैलांची संख्या कमी झाल्याने गावात एक-दोनच बैलांची औत असते. त्यालाही खूप मागणी आहे, त्यामुळे आठवडाभर नंबर लावून ठेवावे लागत आहे. त्यातही गडबडीत जमीन तयार करून पेरणी करायची झाल्यास लहान रोटरचा वापर चांगला होतो; पण तेही वेळेत मिळत नाही. शेतकऱ्याला सकाळी लवकर रोटर चालकाच्या दारात जाऊन बसावे लागत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.
बैलांची संख्या कमी होऊ लागली तसे औतांचे दरही वाढू लागले आहेत. सध्या काही गावांत प्रति दिन १२०० ते १३०० रुपये दर आहे. रोटरचे दर कामानुसार ठरलेले आहेत, तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत बैलांच्या औतांच्या दरात वाढ झाली असून रोटरचे दर प्रत्येक गावातील मागणीनुसार आकारले जात आहेत.
शिवारं फुलली..
खरीप तयारीसाठी शिवारं अरक्षश: फुलून गेली आहेत. सकाळी लवकर शेतकरी कुटुंबातील सगळीच शिवारात दाखल झालेली असतात. दिवसभर झटून काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो.
असे आहेत मशागतीचे दर
- बैल औत - प्रति दिन १२०० रुपये
- रोटरने नांगरट - प्रति गुंठा १५० रुपये
- उसाची भरणी - प्रति गुंठा १३० रुपये
- नांगरट करून सरी सोडणे - प्रति गुंठा २५० रुपये
रोटरच्या मशागतीच्या दरात फारशी वाढ झालेली नाही; पण एकूणच कष्ट व जोखमीचे काम पाहता दर कमीच आहेत. एकदमच सगळ्यांची कामे सुरू झाल्याने कोणाकडे जायचे, असा प्रश्न तयार होतो. - सरदार खाडे (रोटर चालक)