Kolhapur: पंचगंगेचे प्रदूषण; ३४ वर्षांपासून घोषणांचेच सिंचन! पाणी दूषित करण्यास ८८ गावांचा हातभार

By समीर देशपांडे | Published: April 21, 2023 12:32 PM2023-04-21T12:32:41+5:302023-04-21T12:33:22+5:30

१९८९ मध्ये कोल्हापूरमध्ये मोठी काविळीची साथ आली. तेव्हापासून याबाबतच्या लढ्याला सुरुवात झाली. ३४ वर्षे झाली तरी हा प्रश्न अजूनही संपला नाही

The problem of pollution of river Panchganga in Kolhapur district, 88 villages contribute to water pollution | Kolhapur: पंचगंगेचे प्रदूषण; ३४ वर्षांपासून घोषणांचेच सिंचन! पाणी दूषित करण्यास ८८ गावांचा हातभार

छाया : आदित्य वेल्हाळ

googlenewsNext

समीर देशपांडे

कोल्हापूर : एखादा प्रश्न भिजत कसा ठेवावा आणि दरवर्षी त्याबाबत नवनवीन घोषणा कशा कराव्यात याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न. कारण १९८९ मध्ये कोल्हापूरमध्ये मोठी काविळीची साथ आली. तेव्हापासून याबाबतच्या लढ्याला सुरुवात झाली. ३४ वर्षे झाली तरी हा प्रश्न अजूनही संपला नाही. असा एक-एक प्रश्न संपायला एक पिढी जाणार असेल तर हा विकास नेमका कोणत्या दिशेने चालला आहे हा खरा प्रश्न आहे.

सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या जिल्ह्यातील कुंभी, कासारी, तुळशी, धामणी आणि भाेगावती या पंचगंगेच्या उपनद्या आहेत. या पाच नद्यांच्या प्रवाहातून करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथे संगम होतो आणि पंचगंगा नदीची निर्मिती होते. येथून ८१ किलोमीटरवर नृसिंहवाडी येथे पंचगंगा नदी कृष्णा नदीला मिळते. या दरम्यान उभारण्यात आलेले विविध उद्योग, कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी महापालिका, ८८ ग्रामपंचायती या कमी अधिक प्रमाणात या पंचगंगा प्रदूषणाला कारणीभूत आहेत.

नेते अधिकाऱ्यांचे दुर्लक्षच कारणीभूत

१९८९ मध्ये पंचगंगेच्या पाण्याबाबत विचारणा होऊ लागली तरी त्यावेळी इतके औद्योगिकीकरण वाढले नव्हते. पण नंतर लोकसंख्या वाढतच राहिली. औद्योगिकीकरण झाले. शहरांमध्ये लोकसंख्या केंद्रित होऊ लागली. अनेक पाणी योजनांच्या माध्यमातून माणसी रोज ४० लीटर पाणीपुरवठा होऊ लागला. साखर कारखान्यांचे डिस्टिलरी प्रकल्प उभे राहिले. एकीकडे हा सगळा विकास वेगाने होत असताना दुसरीकडे यातून निर्माण होणारे सांडपाणी रोखण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक होते. परंतु, तत्कालीन नेते आणि अधिकारी यांनी हा प्रश्न कधीच गांभीर्याने घेतला नाही आणि आता मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदने द्यायला सर्वपक्षीय झुंबड उडालेली पाहावयास मिळते.

उपाययोजनांचे आदेश कागदावरच

२०१२ मध्ये इचलकरंजीत काविळीच्या साथीमध्ये ८५ नागरिकांचा मृत्यू झाला आणि हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने यासाठी समिती नेमली आणि नियमित आढावा घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश दिले. तेव्हापासून विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली पंचगंगा प्रदूषणाच्या नियमित बैठका होतात. परंतु, प्रश्न अजूनही सुटत नाही. अजूनही दरवर्षी पाणी काळे होते, मग दुर्गंधी सुटते, मासे मरतात, बातम्या येतात, मग नेतेही येतात. भाषणे ठोकतात. पंचगंगा तशीच वाहते आहे. काही ठिकाणी जलपर्णीच्या उदराखालून काही ठिकाणी काळीकुट्ट होऊन.

हे आहेत सांडपाण्यासाठी जबाबदार

  • अ. न. जबाबदार घटक विनाप्रक्रिया नदीत मिसळणारे पाणी प्रतिदिन द.ल.लि.
  • कोल्हापूर महापालिका  -   ०६
  • इचलकरंजी महापालिका   -   २०
  • ग्रामपंचायती ८८   -  ७१.३३


मैला जात नसल्याचा दावा

कोल्हापूर शहराला रोज १३० द.ल.लि. प्रतिदिन पाणीपुरवठा केला जातो. यातून १०४ द.ल.लि. सांडपाण्याची निर्मिती होते. यातील ९९ द.ल.लि.वर प्रक्रिया केली जाते. तर ६ द.ल.लि. सांडपाणी पाच नाल्यांतून पंचगंगा नदीत मिसळते. परंतु, या सांडपाण्यातून नदीत मैला मिसळत नसल्याचा दावा कोल्हापूर महापालिका करते तो किती खरा आणि खोटा हा संशोधनाचा विषय आहे.

बैठकांवर बैठका

उच्च न्यायालयाने सांगितले आहे म्हणून विभागीय आयुक्त कोल्हापूरमध्ये येतात. बैठका घेतात. महापालिका, जिल्हा परिषद, इचलकरंजी महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाटबंधारे विभागाचे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात येतात. मागचा आढावा घेतला जातो. उरलेले काम किती दिवसात करणार असे विचारले जाते आणि बैठक संपून जाते. या गतीने पंचगंगा नदीचे प्रदूषण संपवताना नव्याने काही प्रश्न निर्माण हाेणार आहेत.

Web Title: The problem of pollution of river Panchganga in Kolhapur district, 88 villages contribute to water pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.