Kolhapur: शिरोळ तालुक्यात गाळमिश्रित वाळू उपसा सुरू, स्वस्तात वाळू मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 06:20 PM2024-12-03T18:20:46+5:302024-12-03T18:21:38+5:30
पाटबंधारे, महसूल ठेवणार नियंत्रण
संदीप बावचे
जयसिंगपूर : पुराला कारणीभूत ठरणाऱ्या कृष्णा नदीपात्रातील गाळ काढण्याची प्रक्रिया शिरोळ तालुक्यात सुरू झाली आहे. गाळाबरोबरच गाळमिश्रित वाळूदेखील उपसा केली जाणार आहे. शिवाय स्वस्त दरातील शासनाचे धोरणदेखील राबविले जाणार आहे. ६०० रुपये ब्रास वाळू घरकुल लाभार्थ्यांसह ऑनलाइन नोंदणी करणाऱ्यांना मिळणार आहे. तालुक्यात सहा ठिकाणी उपसा केला जाणार आहे. गाळमिश्रित वाळू उपसा करून डेपोच्या ठिकाणी ती टाकली जाणार असून, त्यावर पाटबंधारे व महसूल विभागाचे नियंत्रण असणार आहे.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या वाळू धोरणानुसार तालुक्यात गाळमिश्रित वाळू उपशाचे धोरण राबविले जात आहे. गेल्या आठ महिन्यापासून हे धोरण कागदावरच होते. शासनाने अडीच वर्षांपूर्वी स्वस्तात ६०० रुपये वाळू देण्याचे धोरण जाहीर केले होते, मात्र, प्रत्यक्षात कृष्णा नदीपात्रातील गाळ व गाळमिश्रित वाळू उपशाची निविदा प्रक्रिया मार्च २०२३ मध्ये पूर्ण झाली होती.
लोकसभा निवडणूक, पावसाळा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीमुळे त्याबाबतची कार्यवाही झाली नव्हती. शेडशाळ, कवठेगुलंद, अर्जुनवाड व घालवाड या ठिकाणी गाळमिश्रित वाळू काढण्याचे धोरण आहे. जलसंपदा विभागाच्या आराखड्यानुसार हे धोरण राबविले जात आहे. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत हे धोरण असल्यामुळे यांत्रिकी बोटीने उपसा केला जाऊ शकतो. त्यासाठी हरित लवादाच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले.
घरकुल लाभार्थ्यांना गुड न्यूज
सर्वांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाकडून विविध घरकुल योजना राबविल्या जात आहेत. मात्र या लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्याचे धोरण आतापर्यंत कागदावरच राहिले आहे. गाळमिश्रित वाळूच्या धोरणामुळे मोफत वाळूचा लाभ आता मिळणार आहे. त्यासाठी पंचायत समिती विभागाने महसूल विभागाकडे मागणी करावी लागणार आहे.
ऑनलाइन नोंदणीने मिळणार वाळू
मोठा गाजावाजा करत शासनाने अडीच वर्षापूर्वी सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात वाळू देण्याच्या धोरणाला मंजुरी दिली होती. स्वस्तातील वाळू मिळेल या आशेने अनेकांनी घरांची बांधकामे हाती घेतली. मात्र शासनाचे स्वस्तातील वाळू धोरण बोलाचाच भात बोलाचीच कढी या उक्तीप्रमाणेच दिसून आली होते. ऑनलाइन पद्धतीने वाळूची मागणी करणाऱ्यांना आता प्रतिब्रास ६०० रुपयांना वाळू मिळणार आहे.
शिरोळ तालुक्यात ज्याठिकाणी गाळ व गाळमिश्रित वाळू उपशाचे धोरण आहे त्याठिकाणची गाळमिश्रित वाळू डेपोच्या ठिकाणीच साठा करायचा आहे. ऑनलाइन नोंदणी करणाऱ्यांना ६०० रुपये ब्रासप्रमाणे वाळू मिळणार आहे. मात्र ती खरेदी करून चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई होईल. गाळमिश्रित वाळू उपशावर पाटबंधारे व महसूल विभागाचे नियंत्रण राहणार आहे. - आनंद पाटील, खनिकर्म अधिकारी