दुष्काळातही वाढली कोल्हापूरची खरिपाच्या पिकांची उत्पादकता

By राजाराम लोंढे | Published: May 11, 2024 01:10 PM2024-05-11T13:10:54+5:302024-05-11T13:14:04+5:30

उत्पादकता वाढीस ही आहेत कारणे :

The productivity of Kharip crops of Kolhapur increased even during drought | दुष्काळातही वाढली कोल्हापूरची खरिपाच्या पिकांची उत्पादकता

दुष्काळातही वाढली कोल्हापूरची खरिपाच्या पिकांची उत्पादकता

राजाराम लोंढे

कोल्हापूर : खरीप हंगामात यंदा पाऊस कमी झाल्याने उत्पादकता घटणार अशी भीती शेतकऱ्यांना वाटत होती. मात्र, प्रत्यक्षात खरीप हंगामातील अन्नधान्य, गळीतधान्य, कडधान्याच्या उत्पादकतेमध्ये हेक्टरी ३५८ किलोंची वाढ झाली आहे. पुरेसा सूर्यप्रकाश व पोषक वातावरणामुळे गळीत धान्याच्या उत्पादकतेमध्ये सर्वाधिक हेक्टरी ४६८ किलोंची वाढ झाली आहे.

जिल्ह्याचे एकूण ४ लाख ७७ हजार हेक्टर हे पेर क्षेत्र आहे. यापैकी १ लाख ८८ हजार ४५९ हेक्टरवर ऊस पीक घेतले जाते. त्यापाठोपाठ खरिपाचे क्षेत्र असते. गेल्या खरीप हंगामात पावसाने उशिरा सुरुवात केलीच; पण अपेक्षित झाला नाही. जिल्ह्याच्या सरासरीच्या ५५ टक्केच पाऊस झाला. त्यात परतीचा पाऊसही फारसा झाला नसल्याने दुष्काळसदृश स्थिती होती. त्यामुळे खरीप पिकांची उत्पादकता कमी होईल, अशी भीती शेतकऱ्यांना होती.

मात्र, अन्नधान्य, गळीत धान्य, कडधान्याच्या उत्पादकतेमध्ये सरासरी हेक्टरी ३५८ किलोंची वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ चांगली असून भुईमूग, सोयाबीन आदी गळीत धान्यांच्या उत्पादकतेमध्ये तुलनेत अधिक वाढ दिसते.

उत्पादकता वाढीस ही आहेत कारणे :

  • एक सारख्या पावसाने खुंटणारी वाढ थांबली
  • सर्वच पिकांना भरपूर सूर्यप्रकाश मिळाल्याने वाढ जोमात झाली
  • पाऊस कमी असला तरी संरक्षित पाण्याची सोय


यंदा उसाच्या क्षेत्रातही वाढ

मागील गळीत हंगामात जिल्ह्यात १ लाख ७२ हजार ४६३ हेक्टरवर ऊस होता; पण यंदा १ लाख ७६ हजार २७८ हेक्टरवर ऊस उभा आहे. जवळपास ५ हजार ८१५ हेक्टरवर उसाचे क्षेत्र वाढले आहे.

तुलनात्मक उत्पादकता, प्रति हेक्टर किलोमध्ये अशी :
धान्य   - खरीप हंगाम २०२२-२३  -  खरीप हंगाम २०२३-२४

अन्नधान्य   -  २७५५  -  ३०१०
गळीत धान्य - १७८१ -   २२४९
कडधान्य  -   ६६०   -   १०११
ऊस  -    ९० (टन)   -   ९३ (टन)

खरीप हंगामात पाऊस कमी झाला असला तरी सूर्यप्रकाश अधिक राहिला. पिकांच्या वाढीस आवश्यक प्रकाश मिळाल्याने उत्पादकता वाढीस मदत झाली. - अरुण भिंगारदेवे (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर)

Web Title: The productivity of Kharip crops of Kolhapur increased even during drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.