हरामखोर प्रवृत्तीच्या व्यक्तीचा कार्यक्रम टाळायला हवा होता, हसन मुश्रीफ यांची सुप्रिया सुळेंवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 12:10 PM2024-09-24T12:10:30+5:302024-09-24T12:11:13+5:30
कोल्हापूर : पुण्यातील मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी माझ्यावर ईडीवरून टीका केली, त्यांना या प्रकरणाच्या वस्तुस्थितीची माहिती असायला हवी ...
कोल्हापूर : पुण्यातील मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी माझ्यावर ईडीवरून टीका केली, त्यांना या प्रकरणाच्या वस्तुस्थितीची माहिती असायला हवी होती. खरेतर ताईंनी अशा हरामखोर प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या कार्यक्रमांना जाणे टाळायला हवे होते, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवरील झालेल्या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विधानसभा निवडणूक तीनही पक्ष स्वतंत्र लढतील, अशी चर्चा आहे. या प्रश्नावर ते म्हणाले, त्यात काही तथ्य नाही. महायुतीचे तीनही पक्ष मिळून विधानसभा लढवतील हे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
प्रत्येक पक्षाने किती जागा मागायच्या हा त्यांचा प्रश्न आहे. पण निवडून येण्याच्या पात्रतेवर तिन्ही पक्षांतील उमेदवार मिळून ठरवले जातील. काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांची नोंद झाल्याची तक्रार झाली आहे. असे प्रकार आढळल्यास नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करावी. निवडणूक विभागाकडून नावे कमी करण्यासाठीची कार्यवाही केली जाईल.
कागलचे आव्हान..
कागल मतदार संघ टिकवणे आव्हानात्मक आहे का, अशी विचारणा केल्यावर मुश्रीफ म्हणाले, आपला मतदारसंघ शाबूत ठेवण्यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधीला प्रयत्न करावेच लागतात. मुंबईतील मेळाव्याला ‘न भूतो ना भविष्यती’ असा प्रतिसाद मिळाला. गेल्या पाच वर्षांत गावागावांत जे चांगले काम झाले आहे. त्यामुळे मेळाव्याला नागरिकांची प्रचंड गर्दी व उत्साह होता.