अदानी ग्रीन एनर्जीचा प्रकल्प भुदरगड वासीयांच्या लोकभावना लक्षात घेवून अखेर रद्द - आमदार प्रकाश आबिटकर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 09:22 PM2024-01-24T21:22:37+5:302024-01-24T21:22:55+5:30
पाटगाव मध्यम प्रकल्प येथे अदानी ग्रीन एनर्जी कंपनी मार्फत उभारण्यात येणारा प्रकल्प भुदरगड वासीयांच्या लोकभावना लक्षात घेवून अखेर रद्द -
गारगोटी: पाटगांव मध्यम प्रकल्पावर अदानी कंपनीमार्फत उभारण्यात येणारा प्रकल्प अखेर रद्द करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांना लेखी पत्राने कंपनीने कळविले आहे.आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केलेल्या पाठपुरावा आणि जनआंदोलनाला यश आले आहे. भुदरगड तालुक्यातील पाटगाव मध्यम प्रकल्पामुळे भुदरगड तालुक्यातील ११५ गावे, वाड्यावस्त्यातील लाखो लोकांचा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि सुमारे १२ हजारहून अधिक हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे.
तालुक्यासाठी जीवनदायी असलेल्या या प्रकल्पावर अदानी ग्रीन एनर्जी कंपनी मार्फ़त अंजिवडे (ता.कुडाळ जि.सिंधुदुर्ग) गावाजवळ नविन धरण बांधण्यात येणार आहे. त्या धरणामध्ये तळंबा खो-यातील साठविलेले पाणी उचलुन पाटगाव मध्यम प्रकल्पामध्ये साठवण्यात येणार असुन त्याचा वापर करुन २१०० मेगावॅट हायड्रोइलेक्ट्रिक पध्दतीने वीजनिर्मिती करणार होते.या प्रकल्पामुळे भुदरगड तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न भीषण झाला असता.यामुळे भुदरगड तालुक्यातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरलेले होते.यामुळे हा प्रकल्प रद्द व्हावा याकरीता भुदरगड तालुक्यातील नागरीक व सर्वपक्षीय नेतेमंडळींनी अनेक आंदोलने केली.
यामुळे हा प्रकल्प रद्द करावी अशी मागणी आमदार आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे निवेदनाव्दारे केली होती. या पाठपुराव्यास यश आले असून आदानी ग्रुप मार्फत २३ जानेवारी रोजी कोल्हापूरचे जिल्हाधिकाऱ्याना संबधित कंपनीने लेखी पत्राद्वारे हा प्रकल्प रद्द केला असल्याची माहिती दिली. अशी माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.