मराठा भवन; जागेसाठी चार वर्षे वणवण, प्रस्ताव मंत्रालयात धूळ खात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 03:40 PM2022-03-18T15:40:11+5:302022-03-18T15:40:41+5:30
आरक्षणाच्या मागणीसाठी एक मराठा.. लाख मराठा अशा घोषणा देत मुठी आवळणारा समाजही या प्रश्नावर मूग गिळून गप्प बसला आहे.
विश्वास पाटील
कोल्हापूर : मराठा समाजाचे शैक्षणिक, सामाजिक विकासाचे केंद्र ठरावे अशा मराठा भवनचा जागेचा प्रस्ताव गेले चार वर्षे मंत्रालयात धूळ खात पडला आहे. या भवनच्या उभारणीसाठी समाजाने दिलेले ३२ लाख रुपये बँकेत पडून आहेत. सरकारकडून जागा देण्याचा निर्णय होत नसल्याने सगळेच काम ठप्प आहे.
कोल्हापूरचे राजकारण, समाजकारण, सहकार, शेती, साखर कारखानदारीपासून एकूणच जिल्ह्याच्या कारभारावर या समाजाचे वर्चस्व आहे. परंतु, तरीही या समाजाच्या प्रातिनिधिक संस्थेला सरकारकडून जागा मिळवून देता आलेले नाही. यासारखे मोठे दुर्दैव नाही अशी भावना या समाजातून व्यक्त होत आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वसंत मुळीक यांच्या पुढाकारातून मराठा भवन उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. हे भवन व्हावे यासाठी मुळीक धडपडत आहेत; परंतु समाजाची ताकद त्यांच्या मागे उभी राहिल्याशिवाय हे भवन उभारणे शक्य नाही. आरक्षणाच्या मागणीसाठी एक मराठा.. लाख मराठा अशा घोषणा देत मुठी आवळणारा समाजही या प्रश्र्नावर मूग गिळून गप्प बसला आहे.
यासाठी मराठा स्वराज्य भवन ट्रस्ट संस्थेकडून जागा मागणीचा मूळ अर्ज २०१४ मध्ये तत्कालीन भाजप सरकारकडे करण्यात आला. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे महसूल मंत्रीही होते. त्यामुळे त्यांनी मनावर घेतले असते तर चुटकीसरशी हा निर्णय होऊ शकला असता, परंतु त्यांनी कोणत्याही संस्थेला जागा न देण्याचा भाजप सरकारचा निर्णय असल्याचे सांगून मी तुम्हाला जागेसाठी तीन कोटी रुपये देतो, त्यातून जागा विकत घ्या असा सल्ला दिला.
परंतु हे तीन कोटीही मिळाले नाहीत व जागाही मिळालेली नाही. चार वर्षांपूर्वी आयटी पार्क शेजारी शासनाची रि.स.नं ६९७-अ मध्ये जागा उपलब्ध आहे. ती ९९ वर्षांच्या कराराने द्यावी, असा परिपूर्ण प्रस्ताव पाठविला. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे १२ जानेवारी २०२० ला नव्याने पत्रव्यवहार केला; परंतु गेल्या दोन वर्षांत त्यावर कोणताच निर्णय झालेला नाही.
एका खोलीतून काम..
सांगली, बेळगाव, हैद्रराबाद अशा विविध ठिकाणी मराठा भवनच्या वास्तू यापूर्वीच उभ्या राहिल्या आहेत. परंतु, कोल्हापुरात मात्र त्यासाठी मराठा समाजाला झगडावे लागत असल्याचा अनुभव आहे. सध्या मराठा समाज संघटनेचे काम मुळीक यांच्या मंगळवार पेठेतील घरातील एका छोट्या खोलीतून चालते. एकूण मराठा समाजालाही मान खाली घालायला लावणारी गोष्ट आहे. परंतु, कोल्हापूरच्या जनतेला व नेतृत्वासह लोकप्रतिनिधी, समाजधुरीणांही त्याचे काहीच वाटत नाही.
पालकमंत्र्यांची जबाबदारी
मराठा भवनसाठी जागा मिळवून देण्याची जबाबदारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावरच आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री पाटील यांनी मोट बांधली तर ते मराठा भवनच काय, नवीन जिल्हा स्थापन करू शकतील एवढी त्यांची राजकीय ताकद आहे. त्यामुळे त्यांनीच या जागेसाठी ही ताकद पणाला लावण्याची गरज आहे. एखादी बैठक घेतल्याने हा प्रश्न मार्गी लागणार नाही.
कसे असेल मराठा भवन..
मराठा समाजाच्या विकासाचे आणि शिवशाहूंच्या विचाराचे केंद्र व्हावे असा भवनचा आराखडा आहे. त्यामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, वसतिगृह, ग्रंथालय, सांस्कृतिक सभागृह, शेतीविषयक मार्गदर्शन केंद्र असे त्याचे स्वरूप असेल. जागा मिळाल्यावर मराठा समाजाचे हजारो लोक असे आहेत की ते प्रत्येकी लाख रुपयांची मदत करायला तयार आहेत. पापा बागवान यांच्यासारख्या व्यक्तीने मराठा समाजाच्या पाठबळामुळे आम्ही कोल्हापुरात उभा राहिलो म्हणून लाख रुपयांची देणगी स्वत:हून आणून दिली आहे. असे अनेक समाज मराठा भवनसाठी मदत करू शकतात. परंतु, जागाच नसल्याने सगळेच काम थांबले आहे.
मराठा भवन व्हावे यासाठी आम्ही गेल्या सहा वर्षांपासून प्रयत्न करत आहोत. परंतु, जागेअभावी सर्व काही ठप्प झाले आहे. पालकमंत्री सतेज पाटील जागा मिळवून देण्याबाबत प्रयत्नशील आहेत. शिव-शाहूंच्या विचारांचे हे भवन होण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. - वसंतराव मुळीक, राष्ट्रीय उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ