Kolhapur: पाऊस काही थांबेना.. शेतीचे पंचनामे होईना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 04:59 PM2024-08-03T16:59:46+5:302024-08-03T17:00:04+5:30
पाणी वाढले फुटांनी.. कमी होतेय इंचाने
कोल्हापूर : जिल्ह्यात आलेले महापुराचे पाणी चार दिवसात फुटा फुटांनी वाढले पण ते कमी होत आहे इंचा इंचाने, त्या गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा धोधो कोसळणाऱ्या पावसाने पुन्हा धडकी भरली आहे. या पूर, पावसाच्या खेळात पंचनाम्यांचा मात्र खेळखंडोबा होत आहे.
आठवड्यापूर्वी पर्यंत म्हणजे शनिवारपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट होता. त्यानंतर गेल्या आठ दिवसात पुराचे पाणी फक्त ५ फुटांनी कमी झाले आहे. कोल्हापूर शहरातील व्हिनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी, कुंभार गल्ली, नागाळा पार्क सारख्या भागांतून पुराचे पाणी ओसरले आहे पण, अजूनही पंचगंगा हॉस्पिटल, शिवाजी पूल, त्यापुढे चिखली, आंबेवाडी सारख्या गावांतील पाणी पूर्णत : ओसरलेले नाही. काही घरांमध्येही अजून पाणी आहे. त्यामुळे या मिळकतींचे पंचनामे करता येईनात.
या आहेत अडचणी
- काही घरांमध्ये अजून पाणी आहे, शेतीतील पाणी तर ओसरायचे नावच घेत नाही त्यामुळे पंचनामे करण्यासाठी कर्मचाऱ्यांना जाता येईना.
- घरमालक आणि भाडेकरूंचा वाद. भाडेकरूंनी घरमालकासोबत करारनामा केला असेल तर नुकसानीची रक्कम भाडेकरूला देता येते. पण तसे नसेल, तर घरमालकाला रक्कम दिली जाते.
- एकाच कुटुंबात पण चारही भाऊ वेगवेगळे राहत आहेत. ते एकाच मिळकतीचा घरफाळा भरत असतील, घर एकाच्याच नावे असेल तर रक्कम नेमकी कुणाच्या खात्यावर पाठवायची.
धोरणाची प्रतीक्षा
नुकसान भरपाईच्या रकमेबाबत शासनाकडून अधिसूचना काढली जाते. २०२३ मध्ये काढलेल्या अधिसूचनेत घरात २ दिवसांहून अधिक काळ पुराचे पाणी राहिले तर १० हजार रुपये देण्याची तरतूद होती. शिवाय दुकाने व टपरी मालकांनाही यात धरले होते पण यावर्षी नेमके काय करायचे आहे याची अधिसूचना शासनाने काढलेली नाही. सध्या तरी प्रशासनाकडून सर्व प्रकारच्या मिळकतींचे पंचनामे केले जात आहेत.
काही घरे व शेतीतील पाणी ओसरलेले नसल्याने पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत. पण जिथे पंचनामे सुरू आहेत. तिथे नागरिकांकडून खूप चांगले सहकार्य मिळत आहे. कुठेही तक्रारी झालेल्या नाहीत. - हरिश धार्मिक, प्रांताधिकारी, करवीर.