'धर्मादाय'च्या सर्व्हर डाऊनने मनस्ताप, दोन महिन्यांपासून कामकाज ठप्प; राज्यभरातील स्थिती 

By इंदुमती सूर्यवंशी | Published: November 29, 2024 05:23 PM2024-11-29T17:23:22+5:302024-11-29T17:23:38+5:30

लोकांचे विविध कामांसाठी हेलपाटे

The registration of trusts, the work of accounts has been stopped since the last month due to the server down in the offices of the Deputy Commissioner of Charity across the state | 'धर्मादाय'च्या सर्व्हर डाऊनने मनस्ताप, दोन महिन्यांपासून कामकाज ठप्प; राज्यभरातील स्थिती 

'धर्मादाय'च्या सर्व्हर डाऊनने मनस्ताप, दोन महिन्यांपासून कामकाज ठप्प; राज्यभरातील स्थिती 

इंदुमती गणेश

कोल्हापूर : राज्यभरातील धर्मादाय उपायुक्त कार्यालयातील सर्व्हर डाऊन झाल्याने गेल्या महिन्याभरापासून न्यासांची नोंदणी, हिशोबपत्रकांचे कामकाज ठप्प झाले आहे. या अडचणीमुळे पक्षकार, वकील व न्यासांच्या नोंदणीसह विविध कामकाजांसाठी आलेल्या नागरिकांना मनस्ताप होत आहे. कोल्हापुरातील एका कार्यालयात महिन्याला किमान ४० ते ५० न्यासांची नोंदणी होते व शेकडोवर हिशेबपत्रके सादर होतात. असा महिनाभर सर्व्हर डाऊन असूनही तो कशामुळे डाऊन झाला याचे कोडे उलगडलेले नाही. तांत्रिक अडचण असल्याचे कारण सांगण्यात येत आहे. लोक एकदम हिशोबपत्रके सादर करत असल्यानेही ही समस्या उद्भवली असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

लोकहितासाठी काम करत असलेल्या, सभासद असलेल्या सार्वजनिक संस्था, संघटना, मंडळे यांचे कामकाज धर्मादाय कार्यालयांतर्गत येते. अशा सर्व संस्थांची नोंदणी करणे, त्यांचे वर्षाला नुतनीकरण करणे, दरवर्षी लेखापरीक्षण सादर करणे, हिशेबपत्रके सादर करणे ही सर्व कामे धर्मादाय कार्यालयांतर्गत केली जातात. मात्र दिवाळीपासून या कार्यालयाच्या सर्व्हरमध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाला आहे.

सकाळी ९-१० वाजता कामकाज सुरू झाले की सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम सुरू होतो तो दिवसभर असाच असतो. सायंकाळी ५ नंतर सर्व्हर जरा वेग पकडतो, तोपर्यंत कार्यालयाची वेळ संपते. हे असे गेले महिनाभर म्हणजे दिवाळीपासून सुरू आहे. सार्वजनिक संस्थांच्या वेगवेगळ्या कामासाठी अनेक पक्षकार, वकील, नागरिक कार्यालयात येतात. अनेकजण परगावहून आलेले असतात. मात्र इथे आल्यावर त्यांना हेलपाटे मारावे लागतात.

मुंबई कार्यालयाकडे रोज पाठपुरावा

याबाबत धर्मादाय उपायुक्त कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व्हर डाऊनची वस्तुस्थिती मान्य केली. हे कार्यालय शासनाधिस्त असल्याने हा प्रश्न मंत्रालयातूनच सोडवला जाणे अपेक्षित आहे. याबाबत रोज मुंबईत पाठपुरावा सुरू आहे. पण अजून त्याला यश आलेले नाही पुढील आठवड्यापासून कदाचित यंत्रणा सुरळीत होऊ शकेल, अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.

हिशोबपत्रकांसाठी दिली मुदतवाढ

सार्वजनिक संस्थांचे आर्थिक वर्ष मार्च महिन्यात संपते, त्यानंतर पुढील सहा महिन्यात त्यांनी हिशोबपत्रके सादर करणे व त्याचे प्रमाणपत्र धर्मादाय कार्यालयाकडून घेणे बंधनकारक असते. मात्र सर्व्हर डाऊनमुळे हे काम थांबले आहे. अखेर कार्यालयाने त्यासाठी संस्थांना डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

न्यायालयीन कामावरही परिणाम

धर्मादाय कार्यालयांतर्गत अनेक संस्थांचे न्यायालयीन खटले चालतात. कोल्हापुरातील धर्मादाय उपायुक्त कार्यालयात तीन कोर्ट आहे. त्यापैकी सध्या दाेन रिक्त आहेत. त्यामुळे एका कोर्टावर ताण येत आहे, त्यात सर्व्हर डाऊनमुळे न्यायालयीन कामावरही परिणाम झाला आहे.

आमच्या समाजाचे रुकडी येथे विश्वकर्मा महिला संस्थेच्या नोंदणीसाठी दोन महिन्यांपूर्वी सर्व कागदपत्रे धर्मादाय कार्यालयाकडे दिली होती. वारंवार पाठपुरावा करूनही संस्थेची नोंदणी का होत नाही याची विचारणा केल्यावर अधिकाऱ्यांनी सर्व्हरची अडचण असल्याने नोंदणी करता येत नसल्याचे दाखविले. चंद्रकांत कांडेकरी, जिल्हाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज

Web Title: The registration of trusts, the work of accounts has been stopped since the last month due to the server down in the offices of the Deputy Commissioner of Charity across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.