कोल्हापूर: फराळे कारखान्याचा हंगाम बंद झाल्याने तीनशे तरुण बेरोजगार, शेतकऱ्यांनाही बसणार फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 12:10 PM2022-11-19T12:10:08+5:302022-11-19T12:15:13+5:30
रायगडचे शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी दहा वर्षापूर्वी फराळ्याच्या फोंड्या माळावर रिलायब शुगर साखर कारखान्याची स्थापना केली आणी तालुक्याला हरित क्रांतीला चालना मिळाली.
सुनिल चौगले
आमजाई व्हरवडे : राधानगरी तालुक्यातील फराळे येथील रिलायबल शुगर कारखान्याचा यंदाचा हंगाम बंद झाल्याने तीनशे तरुणांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. तसेच तालुक्यातील जवळपास दीड लाख टन ऊस इतर कारखान्यात पाठवताना शेतकऱ्यांची दमछाक होणार असून वाहनधारकांनाही याचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे कामगार, शेतकरी व वाहनधारक हतबल झाले आहेत.
राधानगरी मतदारसंघातील लोकप्रतिनिधीच्या अनास्थामुळे तालुक्यात साखर कारखानाच काय तर कोणताही औद्योगिक प्रकल्प उभारला गेला नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी पहायला मिळत आहे. त्यामुळे रोजगारासाठी तरुणाचे जथ्थेच्या जथ्थे कागल व शिरोली एमआयडिसीकडे जातात. रायगडचे शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी दहा वर्षापूर्वी फराळ्याच्या फोंड्या माळावर रिलायब शुगर साखर कारखान्याची स्थापना केली आणी तालुक्याला हरित क्रांतीला चालना मिळाली.
प्रतिदिन दोन ते अडीच हजार क्रशिंग कपँशिटी असणारा कारखाना प्रत्येक हंगामात दीड दोन लाख गाळप करत होता. आतापर्यंत आठ गळीत हंगाम पुर्ण झाले. यावर्षीचा हंगाम सुरु होण्याची तयारी सुरु असतानाच कारखाना प्रशासनाने अचानक हंगामच बंद केल्याने तीनशे कामगांराच्या नोकरीवरच गंडातर येण्याची भिती आहे. तर तालुक्यातील दीड लाख टन ऊस इतर कारखान्याना परत पाठवताना शेतकऱ्यांची दमछाक होणार आहे. तसेच अनेक वाहन धारकानाही याचा मोठा फटका बसणार आहे.
प्रशासनाने त्वरित लक्ष द्याव
३०० कामगार तसेच शेतकरी व वाहनधारकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने याची दखल घेऊन प्रशासनाने कारखाना सुरु होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच लोकप्रतिनिधींनी या विषयात लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
आर्थिक अडचण आल्याने हंगाम वेळेत सुरु झालेला नाही हंगाम सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहे - तुषार राणे - कार्यकारी संचालक, साखर कारखाना