अंबाबाई मूर्तीबाबतचा अहवाल २५ ला सादर होणार! सलग दुसऱ्या दिवशी मूर्तीची पाहणी
By इंदुमती सूर्यवंशी | Published: March 15, 2024 06:48 PM2024-03-15T18:48:07+5:302024-03-15T18:48:38+5:30
पुढील सुनावणी ४ एप्रिलला, अहवालावर होणार चर्चा
इंदुमती सूर्यवंशी, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी तज्ञांनी पाहणी केली. मूर्तीबाबतचा सविस्तर अहवाल २५ तारखेला न्यायालयाला सादर करण्यात येणार आहे. याविषयावरील पुढील सुनावणी ४ एप्रिलला होणार असून त्यात या अहवालावर चर्चा होईल.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची मोठी झीज झाली असून मूर्तीवरील संवर्धनाचा लेप गळून पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर न्यायालयीन आदेशाने गेल्या दोन दिवसांपूर्वी पुरातत्व विभागाचे निवृत्त अधिकारी आर. एस. त्र्यंबके व विलास मांगिराज यांनी मूर्तीची पाहणी केली. शुक्रवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत ही पाहणी झाली. यावेळी स्वत: जिल्हाधिकारी अमोल येडगे, पुरातत्व विभागाचे सहसंचालक विलास वहाने यांच्यासह ॲड, प्रसन्न मालेकर, दिलीप देसाई यांच्यासह वादी प्रतिवादी उपस्थित होते.
हे अधिकारी अंबाबाई मूर्ती पाहणीचा आपला अहवाल २५ मार्च रोजी न्यायालयाला सादर करणार आहेत. याविषयावरील पुढील सुनावणी ४ एप्रिल रोजी होणार असून त्यादिवशी अहवालावर चर्चा होईल.