पीक विमा काढण्यात कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमीच, केवळ २३ हजार संरक्षित क्षेत्र  

By राजाराम लोंढे | Published: August 8, 2024 04:24 PM2024-08-08T16:24:52+5:302024-08-08T16:25:45+5:30

बिगर कर्जदारांचाच सहभाग अधिक

The response of farmers in Kolhapur in taking crop insurance is low, only 23 thousand protected areas   | पीक विमा काढण्यात कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमीच, केवळ २३ हजार संरक्षित क्षेत्र  

पीक विमा काढण्यात कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमीच, केवळ २३ हजार संरक्षित क्षेत्र  

राजाराम लोंढे

कोल्हापूर : केंद्र व राज्य सरकारच्या वतीने प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ३३ हजार ७७२ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत २२ हजार शेतकरी कमी झाले आहेत. खरिपाच्या १ लाख ९२ हजार ६३३ हेक्टरपैकी केवळ २३ हजार ११७ हेक्टरच क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे.

अतिवृष्टी, महापूर, राेगराई या कारणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. यासाठी, केंद्र व राज्य सरकारने खरीप व रब्बी हंगामातील पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. गेल्या वर्षीपासून अवघ्या १ रुपये हप्ता भरून विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन सरकारने केले होते. विमा कंपन्यांना राज्य व केंद्र सरकार विमा हप्त्याची रक्कम देते.

खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये जिल्ह्यातील ५५ हजार शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेतला होता. मात्र, यंदा २०२४-२५ मध्ये दोन वेळा मुदत वाढ देऊनही ३३ हजार ७७२ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.

बिगर कर्जदारांचाच सहभाग अधिक

राष्ट्रीयकृत बँका किंवा विकास संस्थांच्या माध्यमातून पीक कर्ज उचल केलेल्या शेतकऱ्यांचा पीक विम्यातील सहभाग खूपच कमी आहे. केवळ ९१० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांची संख्या तुलनेत अधिक आहे.

यासाठी मिळते नुकसान भरपाई..

  • शेतात पाणी साठून पीक खराब होणे.
  • महापूर, पूर, अतिवृष्टीने पिके वाहून जाणे किंवा कुजणे
  • पीक काढणीपर्यंत आपत्ती, वादळ, अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान
  • नैसर्गिक आपत्ती, कीटक आणि रोगराईचा फटका


भाताला काढणी पश्चातच भरपाई

महापूर, अतिवृष्टीने नुकसान झाले असेल तर ७२ तासात संबधित विमा कंपनीस कळविणे बंधनकारक आहे. त्यानंतर कंपनीच्या वतीने पंचनामा करून भरपाईस पात्र ठरवले जाते. विमा योजनेत संरक्षित पिकांपैकी केवळ भाताला काढणी पश्चात नुकसान भरपाई मिळते.

तालुकानिहाय विमा याेजनेत सहभागी शेतकरी व क्षेत्र हेक्टर मध्ये

तालुका  -  शेतकरी -  क्षेत्र

आजरा  -  १७६०  - १८७५            
गगनबावडा - ६८३  - ४६८
भुदरगड - ९३७  -  ७९७
चंदगड  - ५०४०  - ४५०१
गडहिंग्लज - ४१३४  -  २९९६
हातकणंगले - ५६६३ - ३७०५
कागल  -  २१६३ - १३०८
करवीर  - ३३९४  - १६१५
पन्हाळा - १६५४  -  ७७६
राधानगरी - ३३०७  -  १७१५
शाहूवाडी  - १३७६  -  ९०६
शिरोळ  - ३६६१ - २४४९

Web Title: The response of farmers in Kolhapur in taking crop insurance is low, only 23 thousand protected areas  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.