Kolhapur: चांदीची चकाकी गगनाला; हुपरीतील व्यवसाय थंडावला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 12:43 PM2024-05-20T12:43:56+5:302024-05-20T12:44:17+5:30

चांदीची प्रतिकिलो लाखाच्या दिशेने वाटचाल

The rise in silver prices in commercial trouble, Business in Hupari cooled off | Kolhapur: चांदीची चकाकी गगनाला; हुपरीतील व्यवसाय थंडावला

Kolhapur: चांदीची चकाकी गगनाला; हुपरीतील व्यवसाय थंडावला

तानाजी घोरपडे

हुपरी : नेहमीच ५०-५५ हजारांच्या आसपास खेळत असणाऱ्या चांदीच्या दरामध्ये तब्बल ३८ हजारांची घसघशीत वाढ झाल्याने चांदीचा दर प्रतिकिलो लाखाच्या दिशेने वाटचाल करीत आहॆ. न भूतो न भविष्यती अशा प्रकारची चांदीदरात झालेली वाढ व्यावसायिकांची डोकेदुखी बनली असून, गेल्या काही महिन्यांपासून येथील चांदी उद्योगात मोठ्या प्रमाणात मंदी पसरली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील विविध प्रकारच्या घडामोडींमुळे चांदीदरात सातत्याने होत असलेल्या बेभरवशाच्या चढ-उतारामुळे चांदी खरेदी-विक्रीचे व्यवहार कसे करायचे? अशा समस्येने व्यावसायिकांना ग्रासले आहे.

चांदी खरेदी-विक्री करणाऱ्या (बुलियन) दुकानदारांनी सावध पवित्रा घेत परिस्थितीनुसार व्यवहार करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाकाळात चांदीच्या दरात घसरण झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागला होता. त्यानंतरच्या काळात देशातील सर्वच बाजारपेठांतील सराफ व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू झाल्याने येथील व्यवसायाला काही प्रमाणात अच्छे दिन प्राप्त झाल्याचे पाहावयास मिळत होते. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये चांदी दरात झालेली ३८ हजारांची वाढ सर्वच चांदी व्यावसायिकांची डोकेदुखी बनली आहे.

हुपरी परिसरातील अर्थचक्र थांबले

हुपरी परिसरातील आठ-दहा गावांचा चांदीचे दागिने बनविणे हाच प्रमुख व्यवसाय असून, सध्या या व्यवसायात मोठ्या प्रमाणात मंदी आल्याने परिसरातील सर्व प्रकारचे अर्थचक्र थांबले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागोजागी उभारलेल्या तपासणी नाक्यांचीही भीती असल्याने व्यावसायिक व सराफांनी दागिन्यांची खरेदी-विक्रीच थांबविली होती. त्यामुळे पुढचे काही दिवस येथील चांदी व्यवसायात मंदीचेच वातावरण राहण्याची शक्यता आहे. परिणामी, चांदी उद्योगातील इतर पूरक व्यावसायिकांनाही त्याचा फटका बसणार आहे.

सध्या चांदी उद्योगाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहॆ. दरातील अस्थिरतेमुळे हा व्यवसाय मंदावलेला आहे. आचारसंहिता कालावधीत दागिने बनविण्यासाठी बाहेरून येणारे सोने, चांदी बंद झाल्याने देवीघेवीचे व्यवहारही ठप्प झाले आहेत. सातत्याने होत असलेल्या दरातील चढ-उतारामुळे खरेदी-विक्री पूर्णपणे बंद झाली आहे. तसेच तयार मालाला मागणीच नसल्याने उत्पादित तयार माल तसाच पडून आहे. सध्या परिस्थिती बिकट झाली आहे. - संजय माने, संचालक, कोल्हापूर जिल्हा सराफ संघ, हुपरी

Web Title: The rise in silver prices in commercial trouble, Business in Hupari cooled off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.