राज्यात नदीजोड प्रकल्पाने दुष्काळी भागाचे नंदनवन होणार, आप्पाचीवाडीत सिध्दार्थ भगवान ढोणेंनी केली भाकणूक कथन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 11:40 AM2022-10-15T11:40:44+5:302022-10-15T11:40:59+5:30
भारत देशात समान नागरी कायद्याचा हक्क अस्तित्वात येईल.
म्हाकवे : महाराष्ट्रात नदीजोड प्रकल्प अस्तित्वात येऊन दुष्काळग्रस्त भागात पाणी येईल. त्या भागातही नंदनवन फुलेल. जाती धर्म बिघडून जाती धर्मात वैरत्व वाढेल. या वैरत्वातून हाणामाऱ्या होतील, अशी भविष्यवाणी श्री क्षेत्र आप्पाचीवाडी (ता.निपाणी)येथिल हालसिध्दनाथ यात्रेत नाथांचे भक्त सिध्दार्थ भगवान ढोणे यांनी कथन केली.
शुक्रवारी पहाटेच्या शांततेत ढोणे कुटुंबीयांतील तिसऱ्या पिढीतील सिध्दार्थ ढोणे यांनी भविष्यवाणी कथन केली. सीमा भागातील हजारो भाविक अत्यंत श्रध्दापूर्वक कानांची ओंजळ करून ही भाकणूक ऐकण्यासाठी पहाटे उपस्थित राहिले. लांबून येणारे भाविक रात्रीच दाखल झाले होते. तर जवळच्या गावातील भाविकांची पाऊले पहाटे आप्पाचीवाडीकडे पडत होती.
दरम्यान, मंगळवारपासून सुरू झालेल्या या यात्रेचा आज मुख्य दिवस होता. भाविकांनी दिवसभर महानैवेद्य देण्यासाठी तसेच दर्शनासाठी शिस्तबद्धपणे हजेरी लावली. तसेच, निपाणी पोलिसांनीही गर्दी होऊ नये यासाठी बंदोबस्त वाढविला आहे. आज शनिवारी पहाटे दुसरी भाकणूक होईल. तर सायंकाळी पाच वाजता सर्व सबिन्यासह पालखी मिरवणूक होऊन यात्रेची सांगता होणार आहे.
अन्य भाकिते अशी..
भारत देशात समान नागरी कायद्याचा हक्क अस्तित्वात येईल. गोरगरीब जनता सुखी होईल. आनंदाचे तोरण बांधतील. जगात तापमानाचा धोका वाढेल. जंगलांना मोठ्या प्रमाणात आगी लागतील. वन्य जीवन व औषधी वनस्पती पृथ्वीवरून नष्ट होतील. सीमाप्रश्न राज्यकर्त्यांच्या चर्चेत राहिल. उसाचे काडं अन् दुधाचे भाडं राजकारणाला कलाटणी देईल. निपाणी परिसरात अतिरेकी घुसतील, जाळपोळ होईल. उन्हाळा-पावसाळ्याचे ऋतुचक्र बदलेल. कर्नाटकातील जलाशयाला भगदाड पडेल. चौथाई भाग ओसाड पडेल, जलमय होईल.