बिद्री कारखाना निवडणूक: निकालावर विरोधी आघाडीचे नेते प्रकाश आबिटकरांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले..
By विश्वास पाटील | Published: December 5, 2023 06:03 PM2023-12-05T18:03:09+5:302023-12-05T18:04:51+5:30
कोल्हापूर : बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या निकालात सत्ताधारी पॅनेलची आघाडी कायम ...
कोल्हापूर: बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या निकालात सत्ताधारी पॅनेलची आघाडी कायम आहे. निकालाच्या सुरुवातीपासूनच विरोधी आघाडीची मोठी पिछेहाट दिसून आली. निकालाचा कौल हाती येताच कारखान्याचे अध्यक्ष, आमदार के.पी.पाटील गटाच्या समर्थकांनी जल्लोष करायला सुरुवात केली. या निकालावर विरोधी आघाडीचे नेते आमदार प्रकाश आबिटकरांनी प्रतिक्रिया देताना सत्ताधाऱ्यांनी कारखान्याचा कारभार उत्तम करून दाखवावा. त्यास आमचे सर्व पातळीवर सहकार्य राहील असे सांगितले.
कारखान्याच्या निवडणुकीत आम्ही सभासदांच्या हिताचा कारभार करून दाखवू म्हणून लोकांसमोर गेलो परंतू त्यांनी पुन्हा सत्तारुढ आघाडीलाच कौल दिला. हा कौल आम्ही नम्रपणे स्विकारतो व विजयी झालेल्या सर्वांचे अभिनंदन करतो. त्यांनी कारखान्याचा कारभार उत्तम करून दाखवावा.. त्यास आमचे सर्व पातळीवर सहकार्य राहील असे ते म्हणाले.
आबिटकरांच्या जिव्हारी लागणारा पराभव
गेल्या निवडणूकीत आमदार आबिटकर हे दिनकरराव जाधव व खासदार संजय मंडलिक यांना सोबत घेवून लढले आणि चांगली लढत दिली. यावेळेला मातब्बर नेते व गट त्यांच्यासोबत असतानाही त्यांना अपेक्षित यश न मिळाल्याने हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला. विधानसभेला जेवढे पायाला भिंगरी बांधून ते पळतात, त्याहून जास्त ताकद पणाला लावूनही सत्तांतर घडवून आणण्यात त्यांना अपयश आले. यामागील कारणांचा त्यांना शोध घ्यावा लागेल.
मुस्कान लॉन येथे आज सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. १२० टेबलवरती ही मतमोजणी सुरू आहे. सुरवातीला केंद्रवाईज ५०-५० मतांचे पॅनल टू पॅनेल झालेले मतदान अशी विभागणी करण्यात आली. मतमोजणीच्या सुरुवातीपासून सत्ताधारी पॅनेलच्या उमेदवारांनी घेतलेली आघाडी कायम आहे.