आताच वाढू शकतो साखरेचा विक्री दर; राज्य साखर महासंघाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 09:02 AM2023-07-05T09:02:30+5:302023-07-05T09:02:41+5:30
वाढलेल्या एफआरपीमुळे साखर कारखाने अडचणीत येणार आहेत.
- चंद्रकांत कित्तुरे
कोल्हापूर : वाढलेल्या एफआरपीमुळे साखर कारखाने अडचणीत येणार आहेत. तसेच बाजारातील साखरेचा दरही प्रतिक्विंटल ३४०० रुपयांच्या पुढे आहे. त्यामुळे साखरेचा किमान विक्री दर वाढविण्याची हीच योग्य वेळ आहे. केंद्र सरकारने तो ३,७५० रुपये प्रतिक्विंटल करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाने केली आहे.
गेल्या सहा वर्षांत उसाची एफआरपी पाच वेळा वाढविण्यात आली आहे. ती २,५५० वरून ३,१५० रुपये प्रतिटन झाली आहे. साखरेच्या किमान विक्रीदरात मात्र एकदाच वाढ होऊन तो २९०० वरून ३१०० रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने एफआरपीत प्रतिटन शंभर रुपयांची वाढ गेल्या आठवड्यातच केली आहे. याचवेळी साखरेचा विक्री दर वाढविणेही अपेक्षित होते. मात्र, तो वाढला नसल्याने ही मागणी करीत असल्याचे महासंघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी म्हटले आहे.
दरवाढ का हवी ?
कृषी मूल्य आयोगाने एफआरपीतील वाढीबरोबरच साखरेच्या किमान विक्रीदरातही वाढ करण्याची शिफारस केलेली आहे. साखर किंमत नियंत्रण आदेश १९१८ तील कलम ४ मध्येही एफआरपीव्यतिरिक्त प्रक्रिया खर्च, वित्तीय खर्च यामध्ये दरवर्षी होणाऱ्या बदलाचा आढावा घेऊन साखरेचा किमान विक्रीदर निश्चित केला जाईल, असे म्हटले आहे. मात्र केंद्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
मार्जिन मनी
सहकारी बँका साखरेच्या मूल्यांकनाच्या आधारे कारखान्यांना कर्ज देत असतात. सध्याच्या दराप्रमाणे मिळणाऱ्या कर्जातून १० टक्के मार्जिन मनी धरल्यास प्रतिटन १,११० रुपये, तर १५ टक्के मार्जिन मनी धरल्यास १,२३५ रुपये कमी पडतात. यामुळेच साखरेचा विक्रीदर वाढविण्याची गरज आहे. अन्यथा कारखाने आर्थिकदृष्ट्या डबघाईस येतील.