कोल्हापुरातील गर्भलिंग निदानप्रकरणाची व्याप्ती वाढली, दोन डॉक्टरांसह चौघांना अटक; डॉक्टरच बनले एजंट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 11:27 AM2023-01-23T11:27:47+5:302023-01-23T11:28:17+5:30
रॅकेटमधील डॉक्टरांनी एजंटगिरीसह गर्भपाताचे काम केल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट
कोल्हापूर : अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर या गुन्ह्याची व्याप्ती वाढली आहे. भुदरगड पोलिसांनी रविवारी (दि. २२) आणखी एका एजंटला अटल केली, तर राधानगरी पोलिसांनी नव्याने दोन डॉक्टरसह एका एजंटला अटक केली. गेल्या चार दिवसांत या गुन्ह्यात एकूण १२ संशयितांना अटक झाली असून, त्यात तीन डॉक्टरांचा समावेश आहे. रॅकेटमधील डॉक्टरांनी एजंटगिरीसह गर्भपाताचे काम केल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक शाखा, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, राधानगरी आणि भुदरगड पोलिसांनी उघडकीस आणलेल्या गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर येत आहे. गेल्या चार दिवसांत भुदरगड पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली, तर राधानगरी पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली.
भुदरगड पोलिसांनी रविवारी सकाळी अमोल सुरेंद्र सुर्वे (वय ४२, रा. रूई, ता. हातकणंगले) या एजंटला अटक केली. राधानगरी पोलिसांनी नव्याने दयानंद पांडुरंग संकपाळ (वय ३४, रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी), डॉ. ज्ञानदेव लक्ष्मण दळवी (वय ५२, रा. फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) आणि डॉ. उमेश लक्ष्मण पवार (वय ४७, रा. करंजफेण, ता. शाहूवाडी) या तिघांना अटक केली. अटकेतील सर्व संशयितांना २४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
डॉक्टरच बनले एजंट
या गुन्ह्यात डॉ. ज्ञानदेव दळवी याच्यासह अन्य काही डॉक्टरांनी एजंट बनून गर्भलिंग निदान आणि गर्भपातासाठी महिलांना पुढे पाठवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तर डॉ. उमेश पवार याने गर्भपाताची औषधे पुरवल्याचे स्पष्ट झाले आहे. एजंटना प्रति रुग्ण पाच ते दहा हजार रुपये कमिशन मिळत होते.
तपास पथकाला बक्षीस
गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या रॅकेटचा भांडाफोड करण्यासाठी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक, महिला दक्षता आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पथकाने विशेष कामगिरी केली. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी या कामगिरीचे कौतुक करीत पथकाला १५ हजार रुपयांचे बक्षीस आणि प्रशस्तिपत्र दिले.