Kolhapur- फुलेवाडी खून प्रकरण: ऋषिकेशच्या खुनातील सहाव्या आरोपीचा शोध सुरु, हल्लेखोराचे नाव निष्पन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 12:34 PM2023-11-20T12:34:17+5:302023-11-20T12:35:30+5:30
गुन्ह्यात संशयितांनी वापरलेली शस्त्रे जप्त
कोल्हापूर : फुलेवाडी परिसरात पाठलाग करून गुंड ऋषिकेश रवींद्र नलवडे (वय २४, रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) याचा खून केल्याप्रकरणी आणखी एका हल्लेखोराचे नाव निष्पन्न झाले. विशाल गायतडे (रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) असे सहाव्या संशयिताचे नाव असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. या गुन्ह्यात संशयितांनी वापरलेली शस्त्रे कळंबा तलाव परिसरातून पोलिसांनी जप्त केली.
पूर्व वैमनस्यातून सहा जणांनी फुलेवाडी परिसरात सोमवारी (दि. १३) रात्री गुंड ऋषिकेश नलवडे याचा पाठलाग करून धारदार शस्त्राने १६ वार करून खून केला होता. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी वसीम ऊर्फ मॅसी लियाकत जमादार (वय ३०, रा. टिंबर मार्केट, कोल्हापूर) आणि आनंद बबन येडगे (वय २०, रा. राजारामपुरी) यांना अटक केली, तर तीन अल्पवयीन हल्लेखोरांना ताब्यात घेऊन त्यांची बालसुधारगृहात रवानगी केली.
अटकेतील दोघांच्या चौकशीत सहावा हल्लेखोर विशाल गायतडे याचे नाव निष्पन्न झाल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. गायतडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत असून, त्याच्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
नलवडे याच्या खुनानंतर पळालेल्या हल्लेखोरांनी त्यांच्याकडील दोन तलवारी, एक एडका आणि एक सत्तूर कळंबा तलाव परिसरात टाकला होता. पोलिसांनी हल्लेखोरांना त्या परिसरात फिरवून गुन्ह्यातील शस्त्रे जप्त केली. अटकेतील जमादार आणि येडगे यांची पोलिस कोठडी आज, सोमवारी संपत असून त्यांना न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक रूपाली पाटील यांनी दिली.