..अखेर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा अन् महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज फडकला
By समीर देशपांडे | Published: August 13, 2022 04:59 PM2022-08-13T16:59:24+5:302022-08-13T17:00:31+5:30
गेली चार वर्षे न फडकणारा राष्ट्रध्वज अखेर फडकला
समीर देशपांडे
कोल्हापूर : गेली चार वर्षे न फडकणारा कोल्हापूर पोलीस उद्यानातील देशातील दुसऱ्या क्रमांकाचा आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक ३०३ फूट उंचीचा राष्ट्रध्वज आज, शनिवारी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आसमंतात फडकला. जिल्ह्याच्या विकासासाठी हातात हात घालून काम करू या, असे आवाहन यावेळी मंत्री पाटील यांनी केले. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी मीनाताई गुरव, स्वातंत्र्यसैनिक वसंतराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस विभागाने यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. मनोजकुमार लोहिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अंजली पाटील, समरजितसिंह घाटगे, राहुल चिकोडे उपस्थित होते. यावेळी राष्ट्रध्वज उभारण्यासाठी मेहनत घेतलेले तंत्रज्ञ, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मंत्री पाटील म्हणाले की, नरेंद्र मोदी एक संकल्पना मांडतात आणि नागरिक ती उचलून धरतात अशी अनेक उदाहरणे आहेत. हा राष्ट्रध्वज फडकावा यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग व टीमने मेहनत घेतली.
जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी प्रास्ताविक केले. पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी आभार मानले. सूत्रसंचालन चारुदत्त जोशी यांनी केले. कार्यक्रमाला एनसीसीचे कॅडेट्स, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वज कायम फडकावा यासाठी नियोजन
मंत्री पाटील म्हणाले की, केएसबीपीचे सुजय पित्रे यांनी हा झेंडा उभारण्यासाठी मेहनत घेतली. परंतु मोठ्या वाऱ्यामुळे तो सातत्याने फाटत असे. त्यामुळे आणि कोविडकाळात हा झेंडा फडकला नाही. परंतु आता तो कायमस्वरूपी फडकत राहील अशी व्यवस्था आम्ही करत आहोत. यासाठी परदेशातून साडे चार लाख रुपयांचा एक असे वेगळ्या मटेरियलचे दोन ध्वज मागवण्यात येणार आहेत.