शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदाची निवड प्रक्रिया पुन्हा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 05:55 PM2022-07-20T17:55:28+5:302022-07-20T17:55:54+5:30
निवड समितीने मुलाखतीतील एकही उमेदवार पात्र नसल्याचा अहवाल देत नव्याने प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला.
कोल्हापूर : पात्र-अपात्रतेच्या मुद्दावरून उमेदवारांनी नोंदविलेला आक्षेप आणि त्यानंतर १७ जणांच्या मुलाखती होवूनही एकही उमेदवार पात्र नसल्याचे सांगत गेल्या महिन्यात निवड समितीने शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदाची निवड प्रक्रिया नव्याने राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने प्रक्रिया पुन्हा सुरू केली. कुलसचिव आणि आंतरविद्याशाखा अधिष्ठातापदासाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहेत.
डॉ. विलास नांदवडेकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर रिक्त झालेल्या कुलसचिव पदासाठी गेल्या सात महिन्यांपासून निवड प्रक्रिया सुरू होती. यापदासाठी दि. ४ जून रोजी मुलाखती झाल्या. मात्र, निवड समितीने एकही उमेदवार पात्र नसल्याचा अहवाल देत नव्याने प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला.
आणखी एक पूर्णवेळ अधिष्ठाता मिळणार
आंतरविद्याशाखा अधिष्ठाता निवडीची प्रक्रिया आता विद्यापीठाने सुरू केली आहे. त्यामुळे आणखी एक पूर्णवेळ अधिष्ठाता मिळणार आहेत.