कोल्हापुरातील ‘शाहू सांस्कृतिक’ सभागृह ढासळण्याच्या मार्गावर, लाखोंच्या उत्पन्नावर पाणी सोडण्यामागे गौडबंगाल काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 11:51 IST2025-02-05T11:51:10+5:302025-02-05T11:51:52+5:30
इमारतीवर काहींचा डोळा..

कोल्हापुरातील ‘शाहू सांस्कृतिक’ सभागृह ढासळण्याच्या मार्गावर, लाखोंच्या उत्पन्नावर पाणी सोडण्यामागे गौडबंगाल काय?
कोल्हापूर : बाजार समितीचे शाहू सांस्कृतिक मंदिर अखेरची घटका मोजू लागले आहे. दोन वर्षांपूर्वीच डागडुजी करून त्याचा वापर सुरू झाला असता तर वर्षाला लाखो रुपयांचे उत्पन्न त्यातून समितीला मिळाले असते. पण, संचालक मंडळाच्या मनात काही वेगळेच असून ही इमारत ढासळण्याची वाट पाहत आहे की काय? अशी चर्चा सध्या सुरू आहे.
कोल्हापूर शहरातील सर्वात मोठे व जास्त आसन क्षमता असलेले एकमेव शाहू सांस्कृतिक मंदिर हे मार्केट यार्ड येथे आहे. प्रशस्त पार्किंग, एक हजार आसन क्षमता असल्याने यातून समितीला चांगले उत्पन्न मिळत होते. पण, समितीच्या तत्कालीन संचालकांनी त्याचा वार्षिक एक लाख रुपये भाड्यावर अक्षरश: बाजार केला होता. पंचरत्न कंपनीशी केलेला करार अडीच वर्षापूर्वी संपल्यानंतर ही इमारत समितीच्या ताब्यात आली.
पंचरत्न कंपनीने ताबा सोडताना येथे जाहीर कार्यक्रम व्हायचे, पण समितीच्या ताब्यात आल्यानंतर ही इमारत वापरण्यास योग्य नसल्याची भीती संचालकांना वाटू लागली. ताब्यात घेतल्यानंतर किरकोळ डागडुजी करून इमारत वापरण्यास घेतली असती तर त्यातून उत्पन्न सुरू झाले असते.
इमारतीवर काहींचा डोळा..
कोल्हापूर शहराजवळ व मुख्य रस्त्याला लागून एवढी प्रशस्त जागा असल्याने या इमारतीवर काहींचा डोळा आहे. काही मंडळींनी हालचालीही सुरू केल्या आहेत, कदाचित त्यामुळेच ही इमारत जमीनदोस्त होण्याची वाट पाहिली जात आहे का, असा प्रश्नही उपस्थित होते आहे.
दृष्टिक्षेपात शाहू सांस्कृतिक इमारत..
- जागा - दोन एकर (सभागृह, जेवण विभाग, पार्किंग)
- इमारतीची बांधकाम - १९७४
- आसन क्षमता - १ हजार खुर्च्या
- पंचरत्न कंपनीला भाडेतत्त्वावर दिले - २००१
- कंपनीकडून समितीकडे हस्तांतर - ऑक्टाेबर २०२२