कोल्हापूर: कागलचा शाहू कारखाना ठरला देशातील सर्वोत्कृष्ट
By विश्वास पाटील | Published: September 15, 2022 04:54 PM2022-09-15T16:54:35+5:302022-09-15T16:55:04+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे यंदाच्या वर्षाचे संपुर्ण देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्यासाठीचे अत्यंत मानाचे वसंतदादा पाटील पारितोषिक ...
कोल्हापूर : महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे यंदाच्या वर्षाचे संपुर्ण देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्यासाठीचे अत्यंत मानाचे वसंतदादा पाटील पारितोषिक कागलचा छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास मिळाले आहे.
देशातील सर्व २६७ सहकारी साखर कारखाने व नऊ राज्यातील साखर संघ सदस्य असलेल्या नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करण्यात येते. त्याआधारे ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन ,अधिकतम ऊस गाळप, सर्वोत्तम साखर उतारा , सर्वाधिक निर्यात अशा विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या देशभरातील सहकारी साखर कारखान्यांचे काटेकोर मूल्यमापन केले जाते.
दिल्लीस्थित केंद्रीय मुख्य साखर संचालक यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांच्या समितीद्वारे वर्ष २०२१-२२ साठीची निश्चित केलेली एकूण २१ पारितोषिके राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी गुरुवारी जाहीर केली. या प्रसंगी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.
यंदाच्या वर्षाच्या गुणवत्ता पारितोषिकासाठी देशातील ६५ सहकारी साखर कारखान्यांनी सहभाग घेतला. त्यात महाराष्ट्र (२७), गुजरात (९), तामिळनाडू (९), पंजाब (६), हरियाणा (५), उत्तर प्रदेश (५), कर्नाटक (३) व मध्य प्रदेश (१) यांचा समावेश आहे.
पारितोषिक योजनेच्या धोरणानुसार देशातील उच्च साखर उतारा ( किमान सरासरी १० टक्के) असणाऱ्या राज्यात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात यातील साखर कारखान्यांचा सहभाग होता तर उर्वरित (सरासरी १० टक्क्यांपेक्ष कमी उतारा) साखर उतारा असणाऱ्या राज्यात उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य परदेश आणि तामिळनाडूतील कारखान्यांचा समावेश होता. तसेच "एका कारखान्याला एक पारितोषिक " असे धोरण ठरविण्यात आले. या धोरणामुळे सर्व कारखान्यांच्या कामगिरीला न्याय मिळाला.
एकूण २१ पारितोषिकात महाराष्ट्राने दहा पारितोषिकांसह प्रथम क्रमांक पटकाविला असून दुसऱ्या क्रमांकावरील तामिळनाडूला तीन पारितोषिके प्राप्त झाली आहेत. उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा यांनी प्रत्येकी दोन पारितोषिके मिळविली आहेत तर मध्य प्रदेशाला एक मिळाले.
राष्ट्रीय पारितोषिकांची तपशील
उत्कृष्ट ऊस उत्पादकता :
उच्च उतारा विभाग --
प्रथम पारितोषिक : भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि.पुणे (महाराष्ट्र)
द्वितीय पारितोषिक : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात स.सा..का. अमृतनगर (महाराष्ट्र)
उर्वरित विभाग
प्रथम पारितोषिक : नवलसिंग स.सा.का.मर्यादित ,नवल नगर,बुऱ्हाणपूर (मध्य प्रदेश)
द्वितीय पारितोषिक कल्लाकुरीची-ii :को ऑपरेटिव्ह शुगर मिल्स लि.काचीरायापालयम,तामिळनाडू
तांत्रिक कार्यक्षमता
उच्च उतारा विभाग:
प्रथम पारितोषिक : पांडुरंग स.सा.का.लि.सोलापूर (महाराष्ट्र)
द्वितीय पारितोषिक : श्री विघ्नहर स.सा.का.जुन्नर ,पुणे (महाराष्ट्र)
उर्वरित विभाग
प्रथम पारितोषिक : कर्नाल को ऑपरेटिव्ह शुगर मिल्स लि.कर्नाल (हरियाणा)
द्वितीय पारितोषिक : दि किसान सहकारी चिनी मिल्स लि. साथिऑन ,अजमगड (उत्तर प्रदेश)
उत्कृष्ट वित्तीय व्यस्थापन
उच्च उतारा विभाग---:
प्रथम पारितोषिक : श्री नर्मदा खांड उदयॊग,सहकारी मंडली लि.(गुजरात)
द्वितीय पारितोषिक : श्री खेडूत सहकारी खांड उदयॊग मंडली लि.बार्डोली (गुजरात)
उर्वरित विभाग
प्रथम पारितोषिक : चेंगलारायन को ऑपरेटिव्ह शुगर मिल्स लि.तामिळनाडू
द्वितीय पारितोषिक : किसान सहकारी चिनी मिल्स लि.स्नेह रोड,नजीबाबाद (उत्तर प्रदेश)
विक्रमी ऊस गाळप
उच्च उतारा विभाग : विठ्ठलराव शिंदे स.सा.का. पिंपळनेर, माढा, सोलापूर (महाराष्ट्र) :
उर्वरित विभाग : शाहाबाद को ऑपरेटिव्ह शुगर मिल्स लि.कुरुक्षेत्र (हरियाणा)
विक्रमी साखर उतारा
उच्च उतारा विभाग : डॉ पतंगराव कदम सोनहिरा स.सा.का. लि.सांगली (महाराष्ट्र)
उर्वरित विभाग : किसान सहकारी चिनी मिल्स लि.गजरौला (उत्तर प्रदेश)
विक्रमी साखर निर्यात
प्रथम पारितोषिक : श्री दत्त शेतकरी स.सा.का.लि.शिरोळ, कोल्हापूर (महाराष्ट्र)
द्वितीय पारितोषिक : सह्याद्री स.सा.का लि.सातारा (महाराष्ट्र)
अत्युत्कृष्ट सहकारी साखर कारखाना
उच्च उतारा विभाग --- क्रांतिअग्रणी डॉ जी..डी .बापू लाड स.सा.का.लि.सांगली (महाराष्ट्र)
उर्वरित विभाग -- डी.एस.८ सुब्रमणिया सीवा कोऑपटिव्ह शुगर मिल्स लि.(तामिळनाडू)
दिल्ली होणार पारितोषिक वितरण सोहळा
गुणवत्ता पारितोषिके नवी दिल्ली येथे होणाऱ्या विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार आहेत. त्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, केंद्रीय अन्न मंत्री पियुष गोयल तसेच साखर उद्योगाशी संबधित महाराष्ट्र,उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, पंजाब, हरियाणा, तामिळनाडू, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यांतील मंत्री व संबधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे, असे नाईकनवरे यांनी सांगितले.