शिवसेनेतील बंडाळीपासून चंदगड-गडहिंग्लजकर दूरच !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 01:40 PM2022-06-30T13:40:09+5:302022-06-30T13:40:29+5:30

राज्यातील बहुतेक घडामोडींचे पडसाद येथे हमखास उमटतात. परंतु, शिवसेनेतील बंडाळीपासून गडहिंग्लज विभागातील पदाधिकारीच चार हात दूर असल्यामुळे गडहिंग्लज-चंदगडमध्ये कोणतेही पडसाद उमटलेले नाहीत.

The Shiv Sena mutiny had no repercussions in Gadhinglaj Chandgad in Kolhapur | शिवसेनेतील बंडाळीपासून चंदगड-गडहिंग्लजकर दूरच !

शिवसेनेतील बंडाळीपासून चंदगड-गडहिंग्लजकर दूरच !

googlenewsNext

राम मगदूम

गडहिंग्लज : पूर्वीपासूनच गडहिंग्लज ही अनेक चळवळींची व आंदोलनांची भूमी राहिली आहे. राज्यातील बहुतेक घडामोडींचे पडसाद येथे हमखास उमटतात. परंतु, शिवसेनेतील बंडाळीपासून गडहिंग्लज विभागातील पदाधिकारीच चार हात दूर असल्यामुळे गडहिंग्लज-चंदगडमध्ये कोणतेही पडसाद उमटलेले नाहीत.

१९९०च्या दशकात शिवाजी हिडदुगी, रघुनाथ चव्हाण यांनी गडहिंग्लजमध्ये, दिलीप देऊसकर यांनी आजऱ्यात तर बाबूराव टक्केकर, महादेव पाटील-गुडेवाडीकर यांनी चंदगडमध्ये शिवसेनेची बीजे रोवली.

दरम्यान, गडहिंग्लजमधून शिवाजी हिडदुगी, भय्यासाहेब कुपेकर, प्रकाश शहापूरकर यांनी, तर चंदगड-आजऱ्यामधून तानाजी वाघमारे, केदारी रेडेकर, नरसिंगराव पाटील यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर सुनील शिंत्रे व संग्रामसिंह कुपेकर यांनी चंदगड विधानसभेची निवडणूक लढवली.

१९९५ मध्ये ‘अपक्ष’ भरमूअण्णा पाटील यांनी युती सरकारच्या स्थापनेसाठी राज्यात सर्वप्रथम पाठिंबा दिला. त्याबदल्यात त्यांना रोजगार हमी खात्याचे राज्यमंत्रिपद व कृष्णा-खोरे महामंडळाचे सदस्यपद मिळाले होते. परंतु, कोकण आणि मुंबईशी थेट संपर्क असतानाही नेत्यांच्या ‘सोयी’च्या राजकारणामुळे गडहिंग्लज विभागात शिवसेना म्हणावी तशी रुजली नाही.

सध्या चंदगडचे प्रभाकर खांडेकर व आजऱ्याचे संभाजी पाटील हे उपजिल्हाप्रमुख, तर गडहिंग्लजचे संग्रामसिंह कुपेकर हे संघटक व शिंत्रे हे सहसंपर्कप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. परंतु, आजरावगळता चंदगड व गडहिंग्लजमध्ये शिवसेनेतील बंडाळीचे कोणतेही पडसाद उमटलेले नाहीत, त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

नेते असूनही प्रतिक्रिया नाही

  • गेल्या विधानसभेला भाजप-सेना युतीमधून संग्रामसिंह कुपेकर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. परंतु, जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून ते सेनेपासून दूर आहेत.
  • दोन वर्षे बंद राहिलेला आजरा साखर कारखाना सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: लक्ष घातले होते. परंतु, कोल्हापूरच्या आंदोलनातील सहभागवगळता शिंत्रेदेखील शांतच आहेत.
  • चंदगडचे खांडेकर व आजऱ्याचे संभाजी पाटील यांचीदेखील कोणतीही प्रतिक्रिया नाही.
  • रियाजभाई शमनजी हे ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी मुंबईला गेल्याची चर्चा आहे.
     

केवळ आजऱ्यात मोर्चा

युवराज पोवार व सहकाऱ्यांनी आजऱ्यात मोर्चा काढून बंडखोर आमदार प्रकाश आबिटकर यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. हा अपवादवगळता गडहिंग्लज व चंदगड तालुक्यात कोणतीही प्रतिक्रिया उमटलेली नाही.

Web Title: The Shiv Sena mutiny had no repercussions in Gadhinglaj Chandgad in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.