शिवसेना-शिंदे गटातील खुन्नस टोकाला, कोल्हापुरात शहरप्रमुखावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
By विश्वास पाटील | Published: September 16, 2022 12:45 PM2022-09-16T12:45:44+5:302022-09-16T12:46:33+5:30
या प्रकारास आठ दिवस उलटून गेल्यानंतर शुक्रवारी जुना राजवाडा पोलिसांत याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट व शिवसेना गटातील खुन्नस कोल्हापुरात चांगलीच टोकाला गेली आहे. सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूकीत शिंदे गटाचे शिलेदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या स्वागत कक्षासमोर कोण आला रे कोण आला..शिवसेनेचा वाघ आला हे गीत लावून नृत्य केल्याप्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांवर शुक्रवारी चक्क विनयभंगाचाच गुन्हा दाखल झाला. जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत हे या नृत्याचे मोबाईलवर चित्रीकरण करत होते. त्याच मिरवणुकीत हा प्रकार घडल्याचा गुन्हा दाखल झाला आहे हे विशेष.
इंगवले हे वर्षभरापूर्वी माजी आमदार क्षीरसागर यांचे कट्टर कार्यकर्ते होते. त्यांनीच इंगवले यांना शहरप्रमुख केले होते. परंतू पुढच्या राजकारणात इंगवले डोईजड व्हायला लागल्यावर त्यांनी हे पद मातोश्रीला कळवून त्यांच्याकडून काढून घेतले. तेव्हापासून या दोघांतील राजकीय कलगीतुरा वेगवेगळ्या माध्यमातून सुरु आहे. जयप्रभा स्टुडिओ क्षीरसागर यांची दोन्ही मुले भागीदार असलेल्या खासगी कंपनीने विकत घेतला आहे. या व्यवहारात माझ्या मुलांचा हिस्सा फक्त प्रत्येकी १३ हजारांचा आहे असे त्यांनी जाहीर केल्यावर इंगवले यांनी त्यांच्या दोन्ही मुलांच्या नावे प्रत्येकी १३ हजार रुपयांचे धनादेश स्पीड पोस्टाने पाठवून तुम्ही जयप्रभाच्या व्यवहारातून बाजूला व्हावे असे आवाहन केले होते.
शिवसेनेतील राज्य पातळीवरील बंडाळीनंतर क्षीरसागर-इंगवले यांच्यातील राजकीय कुरघोडीस जास्त धार आली. त्यातच शिवसेनेने इंगवले यांना पुन्हा शहराध्यक्ष पद दिल्याने त्यांनाही पक्षीय पाठबळ मिळाले. त्यामुळेच विसर्जन मिरवणूकीत ते अध्यक्ष असलेल्या शिवाजी पेठेतील फिरंगाई तालीम मंडळाच्या शे-पाचशे कार्यकर्त्यांनी क्षीरसागर यांच्या स्वागत कक्षासमोर जोरदार नृत्य केले होते. त्यावेळी स्वत: क्षीरसागर, त्यांची दोन्ही मुले, व पत्नीही व्यासपीठावर उपस्थित होती. काही काळ तणाव निर्माण झाल्यावर पोलिसांनी ही मिरवणूक पुढे नेली होती. या प्रकारास आठ दिवस उलटून गेल्यानंतर शुक्रवारी जुना राजवाडा पोलिसांत याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. शिवसेनेच्याच माजी शहर संघटिका असलेल्या महिलेने त्याची तक्रार दिली आहे.