देवस्थानचे अध्यक्षपद शिवसेनेला मिळणार?, नरकेंचे नाव चर्चेत; मंत्रिमंडळ विस्तारानंतर नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 11:35 AM2023-06-29T11:35:59+5:302023-06-29T11:36:51+5:30
भाजपकडून माजी अध्यक्ष महेश जाधव यांचेही या पदासाठी जोरदार प्रयत्न
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई, जोतिबासह कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३०६४ मंदिरांचा डोलारा सांभाळणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद शिवसेना शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतरच त्याबाबतच्या हालचाली होतील असे दिसते. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनाच प्रशासक म्हणून एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. भाजपकडून माजी अध्यक्ष महेश जाधव यांचेही या पदासाठी जोरदार प्रयत्न आहेत.
कोट्यावधींचे उत्पन्न, हजारो एकर जमिनी, आणि देवालयांचे व्यवस्थापन करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवरील संचालक मंडळ दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीच्या काळात बरखास्त करण्यात आले. तेव्हापासून तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई व आता जिल्हाधिकारी रेखावार हे समितीचे प्रशासक म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. दोन वर्षांत प्रशासकांनी मंदिर हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. गेल्या वर्षभरात झालेले सत्तांतर, सरकारची अस्थिरता यामुळे कोणत्याच महामंडळावर व समित्यांवर नियुक्त्या झाल्या नव्हत्या. आता मात्र मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने देवस्थान समितीवरील नियुक्त्यांचीही चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर शिवसेना शिंदे गटाकडे व शिर्डी देवस्थान भाजपला दिले जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्षपद शिंदे गटाकडे येणार आहे. अध्यक्षपदासाठी माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नावाची चर्चा आहे. समितीतील एकूण सदस्य संख्येनुसार शिवसेना शिंदे गटाला व भाजपला विभागून जागा दिल्या जातील. मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतरच चित्र स्पष्ट होईल. याबाबत माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मी सध्या विधानसभेच्या तयारीत व्यस्त आहे, त्यामुळे देवस्थान समितीवरील नियुक्तीचा तपशील अजून माझ्यापर्यंत आला नसल्याचे सांगितले.
नरकेंचे नाव चर्चेत
शिंदे गटाने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाविरोधात बंड केल्यानंतर आमदार प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर त्यांच्यासोबत गेले. नरके यांनी तुलनेने उशिरा निर्णय घेतला. क्षीरसागर यांच्याकडे सध्या दोन पदे आहेत. आबिटकर हे कृषी परिषदेचे उपाध्यक्ष आहेत. सध्या नरके यांच्याकडे कोणतेही पद नाही. त्यामुळेच त्यांचे देवस्थान समितीच्या अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत आले आहे.