पालकमंत्र्यांनी रस्ते न्हवे हाडांचे दवाखाने सुरू करावेत : संजय पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 04:23 PM2024-02-27T16:23:16+5:302024-02-27T16:25:01+5:30
नवीन वाशीनाका येथे खड्ड्यात बसून शिवसेना उबाठा गटातर्फे रास्तारोको
अमर पाटील
कळंबा : खराब रस्त्याच्या दर्जामुळे कोल्हापूरचे नाव सर्वत्र बदनाम झाले असून शहरासह उपनगरातील रस्त्याची खड्डे पडून चाळण झाली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी रस्ते निर्माण करण्यापेक्षा प्रत्येक ठिकाणी हाडांवरचे उपचार करणारे दवाखाने सुरू करावेत अशा आशयाच्या घोषणा देत शिवसेना उबाठा गटातर्फे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली नवीनवाशीनाका चौकात रास्तारोको करण्यात आला.
यावेळी संपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाउपाध्यक्ष अवधूत साळोखे, शहराध्यक्ष रविकिरण इंगवले, सुनील मोदी यांच्यासह आंदोलकांनी मुख्य चौकातील खड्ड्यात बसून घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केल्याने राधानगरी रस्त्यावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली.
यावेळी जिल्हाध्यक्ष संजय पवार म्हणाले, मिरजकर तिकटी येथे नुसताच दर्जेदार रस्ते करण्याच्या कामांचा शुभारंभ केला गेला पण त्याचे पुढे काय झाले पालकमंत्री यांनी स्पष्ट करावे. निव्वळ कागदोपत्री विकासकामे दाखवण्यात धन्यता मानली जाते प्रत्यक्ष विकास शून्य. निधी मंजूर झाल्यापासून ते काम सुरू होइपर्यंत टक्केवारीत विभाजन होत असल्याने कोल्हापूरचे नाव बदनाम झाले असून विकास कामे होत नाहीत ही वस्तुस्थिती असल्याचे मत व्यक्त केले.
उपनगरातील सर्वच मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून प्रशासनाला पाहणी करण्यासाठी वेळ मिळत नाही त्यामुळे तात्काळ कोल्हापुरातील रस्त्यांची कामे सुरू न झाल्यास महानगरपालिकेच्या दारात आंदोलन करण्याचा इशारा दिला. शहर अभियंता हर्षदीप घाटगे यांनी घटनास्थळी येवून याप्रश्नी तात्काळ कारवाईचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.