अंबाबाईची चांदीची मूर्ती मंगळवारी देवस्थानला सुपूर्द करणार, ३० वर्षांपूर्वी बनविली होती भरीव मूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 04:39 PM2022-02-25T16:39:11+5:302022-02-25T16:39:38+5:30

अभिषेकामुळे श्री अंबाबाईच्या मूळ मूर्तीची झीज होऊ नये यासाठी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाने ३० वर्षांपूर्वी ही भरीव चांदीची मूर्ती बनविली होती.

The silver idol of Ambabai will be handed over to the temple on Tuesday, The massive silver idol was made 30 years ago | अंबाबाईची चांदीची मूर्ती मंगळवारी देवस्थानला सुपूर्द करणार, ३० वर्षांपूर्वी बनविली होती भरीव मूर्ती

अंबाबाईची चांदीची मूर्ती मंगळवारी देवस्थानला सुपूर्द करणार, ३० वर्षांपूर्वी बनविली होती भरीव मूर्ती

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूर सराफ व्यापारी संघाने बनवलेली ५१ किलो वजनाची करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची चांदीची मूर्ती मंगळवारी (दि. १ मार्च) पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द केली जाणार आहे. यानिमित्त सायंकाळी पाच वाजता शोभायात्रा काढणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. मूर्ती बनविल्यानंतर तब्बल ३० वर्षांनी हा सकारात्मक निर्णय झाला. भाविकांच्या इच्छेनुसार या मूर्तीचा वापर करण्यात येणार असल्याचे देवस्थान समितीने स्पष्ट केले आहे.

अभिषेकामुळे श्री अंबाबाईच्या मूळ मूर्तीची झीज होऊ नये यासाठी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाने ३० वर्षांपूर्वी ही भरीव चांदीची मूर्ती बनविली होती. ही मूर्ती हुबेहुब मूळ मूर्तीसारखी असून त्यावर अभिषेक व्हावा व दैनंदिन धार्मिक विधींमध्ये त्याचा वापर व्हावा, ही संघाची इच्छा होती; पण त्यावेळी मूर्ती देवस्थान समितीला द्यायची की पुजाऱ्यांना यावरून झालेल्या मतभेदांमुळे ती संघाकडेच राहिली.

आता मात्र, संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी १५ दिवसांपासून समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहूल रेखावार व सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे पाठपुरावा केला, देवस्थान समितीनेदेखील तातडीने यावर कार्यवाही करत देवीची मूर्ती ताब्यात घेण्यास होकार दिला. पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष जितेंद्र राठोड, सचिव अनिल पोतदार, संजय जैन, संचालक सुहास जाधव, सुरेश गायकवाड, सुरेंद्र पुरवंत, अमोल ढणाल उपस्थित होते.

शोभायात्रा काढणार

मंगळवारी महाशिवरात्रीचे औचित्य साधून मंगळवारी ही मूर्ती समितीकडे सुपूर्द केली जाणार आहे. तत्पूर्वी सायंकाळी पाच वाजता मूर्तीची शोभायात्रा काढली जाणार आहे. त्यामध्ये रांगोळी, आकर्षक रोषणाई, वाद्यांचा गजर असेल. ४ मार्चला मंदिरात मूर्तीला अभिषेक व महायज्ञ केला जाणार आहे तरी नागरिकांसह तालीम, मंडळे संघटनांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन संघाच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: The silver idol of Ambabai will be handed over to the temple on Tuesday, The massive silver idol was made 30 years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.