वस्त्रोद्योगात कामगारांची व्यथा वेगळीच, कल्याणकारी मंडळाची केवळ पोकळ घोषणाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 11:50 IST2022-02-05T11:39:27+5:302022-02-05T11:50:58+5:30
किमान वेतनाचा पत्ता नाही. कल्याणकारी मंडळाची अनेकवेळा फक्त घोषणाच

वस्त्रोद्योगात कामगारांची व्यथा वेगळीच, कल्याणकारी मंडळाची केवळ पोकळ घोषणाच
अतुल आंबी
इचलकरंजी : महाराष्ट्राचे मॅँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहर परिसरात ७५ टक्के उलाढाल वस्त्रोद्योगावर अवलंबून आहे. त्यामुळे वस्त्रोद्योगाशी संलग्न असलेल्या उद्योगातील कामगार आणि वस्त्रोद्योगात प्रत्येक टप्प्यावर काम करणाऱ्यां कामगारांची व्यथा वेगळीच आहे. किमान वेतनाचा पत्ता नाही. कल्याणकारी मंडळाची अनेकवेळा फक्त घोषणाच झाली आहे. वस्त्रोद्योगातील एकूणच खडतर परिस्थितीमुळे कामगारांची स्थिती अतिशय बिकट बनली आहे.
गेल्या काही वर्षांपासून वस्त्रोद्योगाची परिस्थिती बिकट बनत गेली. त्याप्रमाणे त्यावर अवलंबून असलेल्या प्रत्येक टप्प्यावरील कामगारांचीही अवस्था बिकटच बनली. पूर्वी सव्वा लाख साधे यंत्रमाग होते, ते आता ७५ हजारांवर आले. त्याप्रमाणे पूर्वी ६५ ते ७० हजार असलेले यंत्रमाग कामगार ४५ हजारांवर आले. चार यंत्रमागावर एक कामगार असे नियोजन असायचे. आता आठ, बारा यंत्रमागांवर एकच कामगार काम करीत आहे. नव्या पिढीतील कामगार या क्षेत्राकडे येण्यास तयार नाहीत.
यंत्रमागधारकांना व्यवसायातून चांगला नफा मिळत असल्याने त्यावेळी कामगारांनाही आगाऊ रक्कम (अंगावर बाकी) मोठ्या प्रमाणात दिली जात होती. तसेच चांगले काम करणाऱ्या चांगली मजुरी मिळत होती. सध्या बारा यंत्रमाग चालवूनही पूर्वीच्या चार, सहा यंत्रमागांच्या तुलनेतच मजुरी (पगार) मिळत आहे. त्यात महागाई प्रचंड वाढल्याने संसार चालवणे कठीण बनले आहे.
शहरातील विविध कामगार संघटनांच्या माध्यमातून मजुरीवाढीवर अनेकवेळा आंदोलने झाली. त्यानंतर २०१३ मध्ये महागाई भत्त्यानुसार मजुरीवाढ देण्याचा करार झाला. त्याप्रमाणे पाच वर्षे सुरळीत गेली; परंतु पुन्हा मंदी, लॉकडाऊन, जीएसटी अशा चक्रात गुरफटून यंत्रमागाचीच घडी विस्कटल्याने मजुरीवाढ रखडली. त्यामुळे कामगारांच्या अडचणी कायम राहिल्या. (समाप्त)
दृष्टीक्षेपात कामगार संख्या
यंत्रमाग कामगार : ४५ ते ५० हजार
सायझिंग कामगार : ३५००
प्रोसेसर्स कामगार : १० हजार
वहिफणी कामगार : १० हजार
कांडीवाले, दिवाणजी, गारमेंट असे वस्त्रोद्योगातील एकूण कामगार सुमारे ८० हजार.
अन्य घटकही वस्त्रोद्योगावर अवलंबून
कामगारांसह वस्त्रोद्योगातील पानपट्टी, हॉटेल, वाहतूक अशा सर्वच व्यावसायिकांची आर्थिक उलाढालही वस्त्रोद्योगातील हालचालींवर अवलंबून असते. या सर्वच घटकांना कमी-अधिक प्रमाणात वस्त्रोद्योगाच्या दुरवस्थेचा फटका बसत आहे. शासनाने योग्य धोरण अवलंबून या व्यवसायाला दिशा देणे आवश्यक आहे.
एकसंधपणा आवश्यक
यंत्रमाग व्यवसायातील विविध घटकांची सद्य:स्थिती ‘लोकमत’ने मांडली आहे. यामध्ये शासनस्तरावर प्रयत्न करण्यासाठी राजकीय एकसंधपणा आवश्यक आहे. त्याचबरोबर श्रेय लाटण्यासाठी कोणताही आतातायीपणा न करता विविध संघटनांनीही एकत्रित कृती समिती स्थापन करून या परिस्थितीला तोंड देणे गरजेचे आहे. व्यावसायिकांनीही आधुनिकतेची कास धरत जागतिक बाजारपेठ, उलाढाल, तेजी-मंदी, त्यातील कृत्रिमपणा याचा बारकाईने अभ्यास करून व्यवसाय करावा.