शहीद वडिलांचे स्वप्न पूर्ण करणारा भूमिपुत्र, सैनिकाचे गावात जल्लोषात स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 09:08 PM2023-02-03T21:08:41+5:302023-02-03T21:12:08+5:30
शहीद वडिलांचे अधुरे स्वप्न पूर्ण करून सैन्यातून सेवा निवृत्त झालेल्या नितीकेश मारुती पाटील यांची भव्य मिरवणूक सुरू झाली.
कोल्हापूर/मुरगूड - वेळ सकाळी आठची,ठिकाण मुरगूडचे ज्ञानेश्वर कॉलनी एस टी स्टॅण्ड चा परिसर,मंद आवाजात सनई चौघड्याचा सुमधुर आवाज,अत्यंत देखणी लक्षवेधी रांगोळी,फुलांनी सजवलेली जीप,सुमारे पन्नास ते साठ एन सी सी विद्यार्थी,अचानक एक गाडी थांबली सुमारे सहा फूट उंचीचा सेना पोशाख परिधान केलेला युवक त्यातून खाली उतरला,एन सी सी च्या विद्यार्थ्यांनी सॅल्युट केला आणि भारत माता की जय,वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दणाणला. हलगी कैचाळचा ठेका सुरू झाला आणि शहीद वडिलांचे अधुरे स्वप्न पूर्ण करून सैन्यातून सेवानिवृत्त झालेल्या नितीकेश मारुती पाटील यांची भव्य मिरवणूक सुरू झाली.
सतरा वर्षे सेवेतून सेवा बजावून सेवा निवृत्त झालेले सैनिक नितीकेश मारुती पाटील यांचे मुरगूड,कुरुकली,नागरिक व कुटुंबीयांनी भव्य स्वागत केले.मूळ गाव कुरुकली ता. कागल पण सद्या मुरगूड मध्ये वास्तव्यास असणारे नितीकेश यांच्या वडिलांना सैन्यात असताना १९९६ ला वीरमरण आले होते. त्यावेळी नितीकेश हा नऊ वर्षाचा होता. पतींच्या निधनानंतर छाया यांनी आपला मोठा मुलगा नितीकेश ला सैन्यात घालण्याचा निर्धार केला होता. आपले पती मारुती यांचे देशसेवेचे अधुरे स्वप्न मुलाकडून पूर्ण व्हावे ही अपेक्षा त्यांनी बोलून दाखवल्यानंतर नितीकेशने सैन्य भरती साठी प्रयत्न केला.२००५ मध्ये नितीकेश सैन्यात दाखल झाला.
मुंबई,पंजाब,हरियाणा,ओडिसा,श्रीनगर,अशा अनेक ठिकाणी गेली सतरा वर्षे नितीकेश भारतीय सेनेत कार्यरत होते.या दरम्यान अनेक वाईट घटना घडल्या पण कुटुंबीयांनी दिलेली साथ यामुळे नितीकेश यशस्वी पणे सेवा बजावून सेवा निवृत्त झाले.अत्यंत जल्लोषात निघालेली मिरवणूक मुरगूड मधील ज्ञानेश्वर कॉलनी तील निवासस्थानापर्यत पोहचली. त्याठिकाणी भव्य शामियाना उभा केला होता.औक्षण करून फुलांची उधळण करत नितीकेश त्यांच्या पत्नी अक्षता,आई छाया यांना व्यासपीठावर नेले.यावेळी सपोनि विकास बडवे, रणजितसिंह पाटील,बिद्री कारखान्याचे कार्यकारी संचालक के एस चौगले उपस्थित होते.
सपोनि विकास बडवे यांच्या हस्ते नितीकेश यांचा सत्कार करण्यात आला.स्वागत प्रास्ताविक संभाजी चौगले यांनी केले.सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले.यावेळी मोहन गुजर,रवींद्र शिंदे,प्रा एम पी पाटील,दिलीप कांबळे,मधुकर कुंभार,धोंडीराम परीट,राजेंद्र चौगले,मधुकर चौगले,अनिल मगदुम, निलम माने,सुखदेव चौगले,ज्ञानेश्वर चौगले, संग्राम कळमकर,श्रीपतराव कळमकर,मयूर पाटील आदी उपस्थित होते.-फोटो ओळ :- मुरगूड ता.कागल येथे भारतीय सैन्यातुन सेवा निवृत्त होऊन आलेल्या नितीकेश मारुती पाटील यांची ग्रामस्थांनी भव्य मिरवणूक काढली.