Kolhapur: गोठ्यात म्हशीचे रेडकू बांधण्यावरुन वाद, मुलाने केला वडिलाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 03:39 PM2024-11-16T15:39:42+5:302024-11-16T15:41:56+5:30
हुपरी : गोठ्यात म्हशीचे रेडकू बांधण्याच्या कारणावरून वडील व मुलगा यांच्यात झालेल्या वादातून संतप्त मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी पाईप ...
हुपरी : गोठ्यात म्हशीचे रेडकू बांधण्याच्या कारणावरून वडील व मुलगा यांच्यात झालेल्या वादातून संतप्त मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी पाईप व लाकडी दांडका घातल्याने वडिलांचा जागीच मृत्यू झाला. वाद सोडविण्यासाठी गेलेल्या आजी व आईलाही मुलगा अनिलने मारहाण केल्याने यामध्ये दोघीही जखमी झाले आहेत.
आप्पासाहेब कृष्णा नुल्ले (वय ७०) असे मृताचे नाव आहे, तर अनिल आप्पासो नुल्ले (४५, दोघेही रा. गंगानगर, हुपरी) असे हल्लेखोर मुलाचे नाव आहे. गुरुवारी रात्री झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या वडिलांना उपचारांसाठी शुक्रवारी सकाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनिल हा घेऊन आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची नोंद हुपरी पोलिसात झाली असून, अनिलवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी, शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मळेभागातील गंगानगर वसाहतीमध्ये चव्हाण कुटुंब वास्तव्यास आहे. गुरुवारी रात्री गोठ्यात बांधलेले म्हशीचे रेडकू सुटून बाहेर येऊन एकसारखे ओरडत होते. त्यामुळे वडील आप्पासाहेब यांनी मुलगा अनिल याला झोपेतून उठवून रेडकू गोठ्यात बांधण्यास सांगितले. झोपमोड झाल्याने संतप्त अनिल वडिलांबरोबर वाद घालू लागला. वाद वाढत गेल्याने संतप्त झालेल्या अनिलने जवळच पडलेल्या लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने वडिलांवर जोरदार वार केले. यामध्ये गंभीर झालेले आप्पासाहेब जमिनीवर कोसळले.
हा प्रकार पाहून भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या आजी व आईलाही अनिलने दांडक्याने मारहाण केल्याने या दोघीही जखमी झाल्या आहेत. घटनेचे गांभीर्य नसलेला अनिल एवढे करूनही नंतर अगदी निवांतपणे झोपी गेला. सकाळी उठल्यानंतर आपले वडील जमिनीवर पडल्याचे व आजी आणि आई रडत असल्याचे पाहून जखमी वडिलांना घेऊन अनिल हा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आला. तेथील डॉक्टरांनी जखमी आप्पासाहेब यांची तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी ही माहिती हुपरी पोलिसांना कळविली. पोलिसांनी अनिलवर अटकेची कारवाई केली. याबाबतची फिर्याद हल्लेखोर अनिलचा मुलगा अजित अनिल नुल्ले याने हुपरी पोलिसात दिली आहॆ.