Kolhapur: पत्नीबरोबर मोबाइलवर बोलताना आई मध्येच बोलली, रागात सुऱ्याने वार करत मुलाने केला आईचा निर्घृण खून
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 02:14 PM2024-05-02T14:14:36+5:302024-05-02T14:15:38+5:30
साळोखे पार्कात कौटुंबिक वादातून घटना : आरोपीला अटक
कोल्हापूर : पत्नीबरोबर मोबाइलवर बोलत असताना आई मध्येच बाेलल्याचा राग आल्याने मुलाने थेट सुऱ्याने वार करुन आईचा निर्घृण खून केला. ही घटना मंगळवारी (दि. ३०) रात्री सव्वा आठच्या सुमारास कोल्हापुरातील साळोखे पार्कात घडली. शहनाज (शाहीन) राजमोहम्मद मुजावर (वय ६०, रा. साळोखे पार्क, कोल्हापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा सादिक राजमोहम्मद मुजावर (३६, रा. साळोखे पार्क) याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली.
शहरातील साळोखे पार्कात शाहीन या मुलगा सादिक व मुलीबरोबर राहत होत्या. सादिक हा टेम्पोचालक असून, त्याचा आई व बहिणीबरोबर वारंवार वाद होत होता. मंगळवारी सायंकाळी सादिक त्याच्या दुसऱ्या पत्नीबरोबर घरात मोबाईलवर बोलत असताना आई मध्येच काही तरी बोलल्याने त्यांच्यात पुन्हा वाद झाला. या रागातून सादिकने आईच्या छातीवर, पोटावर व पाठीवर सुऱ्याने तीन वार केल्याने त्या जागीच गतप्राण झाल्या.
सादिकने आईवर हल्ला केल्याचे समजताच शेजाऱ्यांनी त्याच्याकडील सुरा काढून घेत राजारामपुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी त्याला घरातूनच तत्काळ ताब्यात घेतले. रात्री उशिरा त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.
आतेभावावर पाचवेळा हल्ला
सादिक हा किरकोळ कारणावरून आई, बहीण व इतर नातेवाईकांबरोबर वारंवार वाद करत होता. काही दिवसांपूर्वी त्याने त्याचा आतेभाऊ जावेद मुल्ला यांच्यावरही पाचवेळा हल्ला केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
सर्व पोलिस ठाण्यात तक्रारी
सादिकच्या अशा वागण्याने त्याच्या घरच्यांसह नातेवाईकांनी कोल्हापूर शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी दिल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.
नातेवाईकांची सीपीआरमध्ये गर्दी
मृत महिला शेहनाज (शाहीन) यांचा कोल्हापुरात मोठा गोतावळा आहे. या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांनी सीपीआरमध्ये मोठी गर्दी केली होती. आरोपी सादिक याचा पहिल्या पत्नीबरोबर सात वर्षांपूर्वी घटस्फोट झाल्यानंतर त्याने दोन वर्षांपूर्वी दुसरे लग्न केले. दुसरी पत्नी सध्या सांगलीला गेली असून, तिच्याबरोबर तो मोबाईलवर बोलत असताना माय-लेकरांमध्ये वाद झाला. या वादातूनच ही दुर्दैवी घटना घडली.