गणेश आगमन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट; कोल्हापुरात ५१ मंडळांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 12:22 PM2024-09-09T12:22:14+5:302024-09-09T12:23:27+5:30

मंडळांसह ध्वनियंत्रणा मालकही कारवाईच्या फेऱ्यात, न्यायालयात खटले दाखल करणार

The sound of voices in the Ganesha arrival procession Action against 51 circles in Kolhapur | गणेश आगमन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट; कोल्हापुरात ५१ मंडळांवर कारवाई

छाया-नसीर अत्तार

कोल्हापूर : राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणुकीत ५१ मंडळांनी आवाजाचा दणदणाट करून ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केले. सर्वाधिक १२० डेसिबल आवाजाची नोंद करून मंडळांनी नकोसा विक्रम नोंद केला. संबंधित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह ध्वनी यंत्रणा मालकांवरही पोलिसांकडून न्यायालयात खटले दाखल केले जाणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार गणेश आगमन मिरवणुकीत मंडळांनी ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्याचे पालन करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले होते. मात्र, राजारामपुरी येथील आगमन मिरवणुकीत सहभागी झालेल्या ५४ पैकी ५१ मंडळांनी आवाज मर्यादेचे उल्लंघन केले. रहिवासी क्षेत्रात ५५, तर व्यावसायिक क्षेत्रात ६५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज वाढवू नये, असे कायदा सांगतो. मात्र, मंडळांनी नियमांकडे दुर्लक्ष करीत प्रत्यक्षात १२० डेसिबलपर्यंत आवाजाचा दणदणाट केला. पोलिसांच्या तीन पथकांनी शनिवारी सायंकाळी सहा ते रात्री बारापर्यंत मिरवणुकीतील मंडळांच्या ध्वनियंत्रणांची तपासणी केली. 

या मंडळांवर कारवाई

टेंबलाई नाका तरुण मंडळ (अध्यक्ष - रियाज शेट), एकदंत मित्र मंडळ (तुषार माने), जय बजरंगबली मित्र मंडळ (संदीप पाथरुट), चिंतामणी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ प्रणित हिंदवी स्पोर्ट्स (कौशिक विटे), राजारामपुरी तालीम आर. टी. ग्रुप (शुभम ठोंबरे), बाल गणेश तरुण (चेतन शहा), गणेश तरुण मंडळ कोल्हापूरचा विघ्नहर्ता (सचिन चौगुले), जय शिवराय तरुण मंडळ (श्रीयश आठणे), छत्रपती राजे शिवाजी तरुण मंडळ (आशिष कांबळे), शिव गणेश मित्र मंडळ (चव्हाण), न्यू गणेश मंडळ (वृषभ कापसे), जय शिवराय मित्र मंडळ जे. एस. ग्रुप (अक्षय जितकर), फ्रेंडस तरुण मंडळ (शैलेश जाधव), राधेय मित्र मंडळ (अभिलाष पाटील), चॅलेंज स्पोर्ट्स (निखिल पालकर), चॅन्सलर फ्रेंड्स सर्कल (विनोद पाटील), 

अजिंक्यतारा मित्र मंडळ (मोहम्मद तेरदाळ), प्रिन्स शिवाजी फ्रेंड्स सर्कल (संदीप शिंदे), जय शिवराय मित्र मंडळ (प्रकाश मळगेकर), जिद्द युवक संघटना (ओंकार वाझे), क्रांतिवीर तरुण मंडळ (वृषभ बामणे), वेलकम फ्रेंड्स सर्कल (रुणाल कुहाडे), कीर्ती तरुण मंडळ (मनोज कलकुटकी), हनुमान तालीम मंडळ (कपिल कवाळे), स्वामी समर्थ मित्र मंडळ (सिकंदर शेख), सस्पेन्स फ्रेंड्स सर्कल (आरिफ कुडचीकर), दी गणेश सांस्कृतिक सेवा मंडळ एस. एफ. (योगेश लोंढे), शिवशक्ती मित्र मंडळ (सूरज कामेरे), इंद्रप्रस्थ तरुण मंडळ (स्वप्निल जगताप), फायटर बॉइज (सिद्धांत लोहार), अचानक मित्र मंडळ (नीलेश चव्हाण),

उपनगरचा राजा न्यू ग्रुप, आपटेनगर (आतिक मलबारी), न्यू तुळजाभवानी तरुण मंडळ, साने गुरुजी वसाहत (अनिकेत आळवेकर), मृत्युंजय मित्र मंडळ, साने गुरुजी वसाहत (प्रणव जाधव), ए बॉइज तरुण मंडळ, साने गुरुजी वसाहत (किशन अनंतपूरकर), दत्ताजीराव काशीद चौक तरुण मंडळ (आदेश कांबळे) आणि जादू ग्रुप, टेंबे रोड (श्रेयस पाटील) या मंडळांवर जुना राजवाडा पोलिसांनी कारवाई केली.

जिव्हाळा कॉलनी मित्र मंडळ (ओम पाटील), स्वराज्य तरुण मंडळ, फुलेवाडी (रोहित लायकर), हनुमान सेवा मंडळ, शुक्रवार पेठ (यश घाडगे), सोल्जर तरुण मंडळ, तोरस्कर चौक (प्रशांत चिले) आणि अमर तेज तरुण मंडळ, रविवार पेठ (अनिल पाटील) या मंडळांवर लक्ष्मीपुरी पोलिसांनी कारवाई केली.

पंचमुखी तरुण मंडळ (सागर आमते), जय शिवराय तरुण मंडळ (सचिन ठोंबरे), उलपे मळा मित्र मंडळ (रोहन कोलीलकर), जयहिंद स्पोर्टस मित्र मंडळ (संकेत पोहाळकर), हिंदुस्थान मित्र मंडळ (प्रसाद चव्हाण), न्यू संयुक्त शाहूपुरी मित्र मंडळ (पृथ्वी मोरे), दी ग्रेट तिरंगा मित्र मंडळ (राजेश मोरे), श्री कृष्ण मित्र मंडळ (संतोष भिरंजे) आणि कुचकोरवी समाज विकास मित्र मंडळ (साईनाथ मोरे) या मंडळांवर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली. करवीर पोलिसांकडूनही काही मंडळांवर कारवाई केली जाणार आहे.

अशी होऊ शकते शिक्षा

ध्वनी प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार दोषी आढळल्यास संबंधितास एक लाख रुपये दंड किंवा पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते. किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात. यापूर्वी गुन्हे दाखल झालेल्या काही मंडळांचे पदाधिकारी अजून न्यायालयात हेलपाटे घालत आहेत.

Web Title: The sound of voices in the Ganesha arrival procession Action against 51 circles in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.