मोठ्या ध्वनी यंत्रणेमुळे कान झाला बाद; कोल्हापुरातील राजू ढवळे दहा वर्षांपासून भोगताहेत बहिरेपणाची फळे

By संदीप आडनाईक | Published: September 12, 2024 12:58 PM2024-09-12T12:58:11+5:302024-09-12T12:58:37+5:30

मिरवणुकीतील ध्वनी यंत्रणेचा आवाजामुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम

The sound system in the Ganeshotsav procession has affected many people's health due to the noise | मोठ्या ध्वनी यंत्रणेमुळे कान झाला बाद; कोल्हापुरातील राजू ढवळे दहा वर्षांपासून भोगताहेत बहिरेपणाची फळे

मोठ्या ध्वनी यंत्रणेमुळे कान झाला बाद; कोल्हापुरातील राजू ढवळे दहा वर्षांपासून भोगताहेत बहिरेपणाची फळे

संदीप आडनाईक

कोल्हापूर : सामान्यत: ७० ते ८० डेसिबलचा आवाज सात ते आठ तास कामावर पडला तरी मानवी श्रवण यंत्रणा ती सहन करू शकते, मात्र ११० किंवा त्यापेक्षा अधिक डेसिबलच्या आवाजाने बहिरेपणा येतो. गणेशोत्सवातील मिरवणुकीतील ध्वनी यंत्रणेचा आवाज ११० ते १७० डेसिबलचा असल्याने मिरवणुकीनंतर अनेकांच्या आरोग्यावर परिणाम हाेत असल्याचे हळूहळू उघड होत आहे. या आवाजामुळे पाच टक्के रुग्ण बहिरे होतात, तर दोन टक्के रुग्णांना हृदयविकार जडतो. आता लेसर किरणांच्या माऱ्यामुळे दृष्टीही गमावल्याची उदाहरणे समोर येत आहेत.

कोल्हापुरातील रविवार पेठेत राहणारे बांधकाम व्यावसायिक राजू ढवळे हे आज ५८ वर्षांचे आहेत. दहा वर्षांपूर्वी जेव्हा गणेश मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजातील ध्वनियंत्रणेचे नव्याने फॅड सुरू झाले होते, तेव्हा ढवळे यांच्या कानावर त्याचा आघात झाला. तेव्हा उमा टॉकीज ते आझाद चौक या मार्गावरून गणेश मिरवणूक काढण्यात येत असे. काॅमर्स कॉलेजजवळ, तसेच सिग्नलला मिरवणुका थांबून राहत. या मार्गावर विजेच्या मोठ्या तारा असत. त्या काढेपर्यंत वाद्यांचा दणदणाट सुरूच असायचा. तेव्हा ही यंत्रणा नवी होती, उत्सुकता म्हणून अनेकजण त्याचा आनंद घेत होते, परंतु यानंतर माझ्या दोन्ही कानांना अचानक ऐकायला येणे बंद झाले.

कोल्हापूर, नंतर इस्लामपूर, पुणे आणि मुंबईत वर्षभर उपचार घेतले. शेवटी जर्मनीतील एका डॉक्टरने मुंबईत माझ्या उजव्या कानावर शस्त्रक्रिया केली. त्याकाळी यासाठी साडेतीन लाख रुपये खर्च आला. गेल्या आठवड्यात आगमन मिरवणुका सुरू होत्या. परंतु, त्या पूर्ण होईपर्यंत मी जागेवरच थांबून राहिलो. विज्ञान प्रबोधिनीसारख्या संघटनेशी जोडला गेला आहे, दुसऱ्याला याचा मिरवणुकांचा त्रास होऊ नये यासाठी जनजागृती करतोय.

माझ्या एका कानाने ऐकू येत नाही. त्याचा माझ्या जीवनशैलीवर फरक पडला. नोकरीवर परिणाम झाला. दुचाकी चालवणे पूर्णपणे बंद झाले आहे. मोबाईलची रिंग समजते, पण तो कोठे ठेवलाय याची दिशा समजत नाही. कानातून अजूनही विचित्र आवाज येत असतात. टीव्हीचा आवाज, पावसाचा, वर्तमानपत्राचा आवाज तसेच दातावर दात जरी आपटला तरी पाचपट मोठा आवाज ऐकू येतात. - राजू ढवळे, रविवार पेठ.

Web Title: The sound system in the Ganeshotsav procession has affected many people's health due to the noise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.