राज्यातील रक्तपेढ्यांच्याच धमण्यातील रक्त गोठतेय, निर्बंधामुळे पेच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 11:48 AM2023-03-09T11:48:48+5:302023-03-09T11:49:13+5:30
रक्तपेढ्यांच्या कामकाजावर परिणाम
राजाराम लोंढे
कोल्हापूर : राज्य रक्त संक्रमण परिषदेने रक्तपेढ्यांतील अतिरिक्त रक्तसाठा इतर ठिकाणी हस्तांतर करण्यावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे रक्त खराब होण्याचे प्रमाण वाढत असून, रक्तपेढ्यांच्याच धमण्यांतील रक्त गोठण्याची वेळ आली आहे. येथे शिबिरे कमी झाल्याने अचानक रक्ताची मागणी वाढली, तर रुग्णांसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. कर्नाटकात निर्बंध नसल्याने ते सीमा भागात मोठ्या प्रमाणात शिबिरांचे आयोजन करत आहेत.
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रक्तदान चळवळ अधिक जोमात राबवली जाते. त्यामुळे महाराष्ट्राची गरज भागवून इतर शेजारील राज्यांना रक्तपुरवठा केला जातो. मात्र, राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या आदेशानुसार राज्य रक्त संक्रमण परिषदेने राज्यातील रक्तपेढ्यांना रक्तसाठा हस्तांतरणांवर निर्बंध आणले आहेत. त्याचा परिणाम रक्तपेढ्यांच्या कामकाजावर झाला आहे.
कॅन्सर रुग्णांना उपचारात प्लेटलेट पेशी द्याव्या लागतात; पण शेजारच्या रक्तपेढीत प्लेटलेट पेशी शिल्लक नसतील, तर त्या बाहेरच्या जिल्ह्याच्या रक्तपेढीतून मागणीनुसार आणाव्या लागतात. आता तर तीव्र उन्हाळ्यामुळे ॲनिमिया व थॅलेसमिया रुग्णांसाठी रक्ताची मागणी वाढत आहे, तसेच तातडीच्या शस्त्रक्रियांसाठी रक्त व प्लेटलेट पेशी यांच्या मागणीतही वाढ होत आहे; पण आवश्यक असलेला रक्तगट किंवा घटक जवळच्या रक्तपेढीत मिळेलच याची खात्री नाही. ते मिळविण्यासाठी रुग्णांना पायपीट करावी लागत आहे.
रक्तगट व प्लेटलेट पेशींची उपलब्धता यापूर्वी रक्तपेढीकढून केली जायची; पण राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या निर्देशामुळे दुर्मीळ रक्तगट किंवा रक्तघटक एका रक्तपेढीकढून दुसऱ्या रक्तपेढीत उपलब्ध करून ठेवता येत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची दमछाक होत आहे.
चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई हवीच
परराज्यात रक्ताचा पुरवठा करताना हस्तांतरणासंंदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. यामध्ये प्रामुख्याने तापमान व सेवाशुल्क याबाबतचा अहवाल प्रशासनाला देणे क्रमप्राप्त आहे. सुरक्षित रक्तसंकलन ते रुग्णापर्यंत सुरक्षित रक्त वितरित करण्याची जबाबदारी रक्तपेढ्यांची असल्याने चुकीचे काम करणाऱ्या रक्तपेढ्यांवर प्रशासनाने कारवाई करावीच.
सरकारची दुटप्पी भूमिका
एकीकडे सरकार ‘जयंती’, वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरांची संख्या वाढवण्याचे आवाहन रक्तपेढ्यांना करते. दुसऱ्या बाजूला रक्तसाठा हस्तांतरणावर बंदी घातल्याने रक्तपेढ्यांमध्ये अस्वस्थता आहे.
हस्तांतरणावर निर्बंध घातल्याने रक्तपेढ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. याकडे राज्य रक्तसंक्रमण परिषद व आरोग्य विभागाने लक्ष घालून रक्तदान चळवळ वाचवावी. -प्रकाश घुंगूरकर (अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा रक्तपेढ्या असोसिएशन)