Election: अखेर ठरलं! पाऊस संपताच निवडणुकीचा धुरळा, महापालिकेची ३१ मे रोजी आरक्षण सोडत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 11:44 AM2022-05-24T11:44:14+5:302022-05-24T11:45:33+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील पाऊस लक्षात घेता ही निवडणूक ऑक्टोबरनंतर होईल असा एक अंदाज बांधण्यात येत होता; परंतु राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी राज्यातील कोल्हापूरसह तेरा महानगरपालिकांना दिलेल्या निर्देशानुसार ही निवडणूक पाऊस संपताच कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक कधी होणार याबाबत संभ्रम असतानाच राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार मंगळवार, दि. ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता येथील केशवराव भोसले नाट्यगृहात प्रभाग आरक्षण सोडत काढण्याची पालिका प्रशासनाने तयारी सुरू केली.
ज्या महानगरपालिका क्षेत्रात पाऊस कमी आहे तेथे तातडीने निवडणूक प्रक्रिया सुरू करावी आणि जेथे पाऊस जास्त आहे तेथे दुसऱ्या टप्प्यात म्हणजे पाऊस संपल्यानंतर निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत, त्यानुसार आयोगाकडून तयारी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर केला.
कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक दिवाळीनंतर होणार की पावसाळा संपताच लगेच होणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती; परंतु अधिकृत अशी माहिती कोणाकडेही नव्हती. नागरिकांसह खुद्द महापालिका अधिकारीही संभ्रमात होते. कोल्हापूर जिल्ह्यातील पाऊस लक्षात घेता ही निवडणूक ऑक्टोबरनंतर होईल असा एक अंदाज बांधण्यात येत होता; परंतु राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी राज्यातील कोल्हापूरसह तेरा महानगरपालिकांना दिलेल्या निर्देशानुसार ही निवडणूक पाऊस संपताच कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे.
ओबीसीशिवाय आरक्षण सोडत
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे ही आरक्षण सोडत ओबीसींना वगळून होणार आहे. नगरसेवक पदाच्या ९२ जागांमध्ये ओबीसींना २७ टक्के याप्रमाणे २५ जागा मिळणार होत्या. परंतु, आता ओबीसीचे आरक्षण असणार नाही.
त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवावी लागणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या राजकीय पक्षांनी ओबीसी उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक झाली तर ती एक ऐतिहासिक घटना असेल.
प्रक्रिया अशी असेल..
- अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता सोडत काढण्याची नोटीस शुक्रवारी (दि २७ मे) प्रसिद्ध करण्यात येणार.
- प्रत्यक्ष आरक्षण सोडत ही मंगळवारी (३१ मे) काढणार.
- सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप दि. १ जूनला प्रसिद्ध.
- दि. १ ते ६ जूनअखेर प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत
- सर्व हरकती व सूचनांचा विचार करून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण १३ जूनला शासन राजपत्रात प्रसिद्ध होणार.
- ही प्रक्रिया एकदा पूर्ण झाल्यावर आयोग निवडणूक कार्यक्रम जाहीर करू शकते. तो साधारणपणे ३५ ते ४५ दिवसांचा असतो.
असे असेल आरक्षण
- एकूण जागा - ९२, वॉर्ड ३१
- सर्वसाधारण महिला- ४०
- सर्वसाधारण पुरुष - ३९
- अनुसूचित जाती महिला ६
- अनुसूचित जाती पुरुष ६
- अनुसूचित जमाती महिला- पुरुष १
४६ पुरुष, ४६ महिला
महापालिकेच्या नवीन सभागृहात ४६ महिला व ४६ पुरुष नगरसेवक असतील. अनुसूचित जमातीसाठी एक जागेचे आरक्षण आहे. ही जागा पुरुषांसाठी आरक्षित झाली तर सर्वसाधारण प्रवर्गातून पुुरुषासाठीची एक जागा कमी होणार आहे.