कोल्हापूरच्या सर्किट बेंचबाबत राज्य सरकार प्रयत्नशील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2023 11:33 AM2023-07-15T11:33:43+5:302023-07-15T11:34:33+5:30
कोल्हापूरच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी देऊ
कोल्हापूर : कोल्हापूरसह चार जिल्ह्यांची मागणी असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचबाबत राज्य सरकार प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी रात्री येथे बोलताना दिली. कोल्हापूरच्या विकासासाठी जेवढा निधी द्यावा लागेल तेवढा देण्यात आमचे सरकार कमी पडणार नाही. एकनाथ शिंदे जे बोलतो ते करून दाखवितो, असे त्यांनी सांगितले.
येथील पेटाळा मैदानावर झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे मार्गदर्शन करत होते. या मेळाव्यात कोल्हापूर शहराच्या प्रश्नांचा आधीच्या वक्त्यांनी ऊहापोह केला. त्याचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले.
कोल्हापूरकरांनी शिवसेनेवर भरभरून प्रेम केले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे कोल्हापूरवर प्रेम होते. ते चांगल्या कामाची सुरुवात कोल्हापुरातून करायचे. त्यामुळे कोल्हापूर आणि शिवसेना यांचे नाते अतूट असून हे नाते निर्माण करण्याचे काम तुम्ही सर्वांनी केले आहे. या नात्यापोटीच आम्ही सत्तेत आल्यापासून कोल्हापूरला मदत करायची ठरविली आहे. रंकाळा तलाव, पंचगंगा शुद्धिकरण, येथील ऐतिहासिक, धार्मिक स्थळांचे संवर्धन, अंबाबाई मंदिर परिसरातील कामे यासाठी एक सर्किट तयार करून निधी उपलब्ध करुन दिला जाईल.
अंतर्गत रस्त्यांसाठीही निधी
रस्त्यांसाठी १०० कोटी रुपये दिले आहेत. कन्व्हेन्शन सेंटरसाठी १०० कोटींचा निधी दिला आहे. महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने आता शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठीही राज्य सरकारतर्फे निधी दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महानगरपालिकेसह अन्य विभागांत काही अधिकारी नसल्याचे मला सांगण्यात आले आहे. त्याची पूर्तता लवकरच केली जाईल. शाहू स्मारकासाठीही निधी दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
नरके गट अनुपस्थित
या मेळाव्यास माजी आमदार चंद्रदीप नरके हे स्वत: व त्यांचे कार्यकर्तेही उपस्थित नव्हते. त्यामुळे ते नाराज होऊन आले नाहीत की काय अशी चर्चा सभास्थळी होती. त्यांना याबाबत विचारले असता, नरके म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे विमानतळावर जाऊन स्वागत केले. साखरपुडा समारंभ असल्याने मला सभेला येण्यास अडचण असल्याचे त्यांना सांगितले होते. त्यामुळे नाराजीचा प्रश्नच नाही.