कोल्हापुरात गव्यांचा मुक्काम वाढला; चारा, पाण्यामुळे पाय निघेना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 01:35 PM2022-11-14T13:35:03+5:302022-11-14T13:35:27+5:30
गवे अजूनही पंचगंगा नदीपात्रात वडणगेच्या मार्गावरच
कोल्हापूर : रमणमळा परिसरातील शेतात असलेले मुबलक गवत आणि पाण्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूर शहरात असलेला गव्यांचा मुक्काम वाढला असून त्यांचा पाय परतीच्या वाटेने निघेना. रविवारी हे गवे शहरात मुख्य वस्तीत येऊ नयेत यासाठी वनविभागाकडून शिकस्त होत आहे.
जयंती नाला परिसर ते महावीर महाविद्यालयाच्या पिछाडीस असलेल्या शेताकडे जाणाऱ्या वाटा वनविभागाने सुरक्षेसाठी बंद केल्या आहेत. या परिरसरात सहा गव्यांचा कळप मुक्कामी आहे. पंचगंगा नदीकाठावरच्या गवताची त्यांना भुरळ पडली आहे. येथील शेतकऱ्यांनी रविवारीही यातील काही गवे दिसल्याचा दावा केला आहे.
या गव्यांचा रमणमळा परिसरात वावर कायम राहिल्याने वनविभागाने आपली गस्तही कायम ठेवली आहे. आठजणांच्या संयुक्त रेस्क्यू टीमने दिवसभर गस्त घातली. सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून पथकातील वनकर्मचाऱ्यांनी हे गवे शहरात येऊ नयेत, यासाठी मिरच्यांच्या धुरी आणि शेकोटी पेटवून ठेवली. हे गवे अजूनही पंचगंगा नदीपात्रात वडणगेच्या मार्गावरच आहेत.
पूर्ण वाढ झालेल्या या गव्यांचा कळप परिसरातील उसातच मुक्काम ठोकून आहे. करवीरचे वनक्षेत्रपाल रमेश कांबळे, वनपाल विजय पाटील या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक रात्रपाळीत गस्त घालत आहे.