कोल्हापुरात पहिल्यांदाच फुलले पळस कुळातील 'पायमोज्याचे झाड'
By संदीप आडनाईक | Published: January 8, 2024 12:55 PM2024-01-08T12:55:21+5:302024-01-08T12:55:31+5:30
कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयासमोरील टाऊन हॉल उद्यानात शहरात एकमेव असलेला पळस कुळातील पायमोज्याचा वृक्ष यावर्षी प्रथमच बहरला आहे. यापूर्वी ...
कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयासमोरील टाऊन हॉल उद्यानात शहरात एकमेव असलेला पळस कुळातील पायमोज्याचा वृक्ष यावर्षी प्रथमच बहरला आहे. यापूर्वी या वृक्षाला कधीही फुले आली नसल्याने त्याची शास्त्रीयदृष्ट्या पुष्टी झाली नव्हती. यंदा या झाडाला फुले आल्याने वनस्पती तज्ञ डॉ. मकरंद ऐतवडे यांनी अभ्यासाअंती याची रीतसर पुष्टी केली आहे. या वृक्षाची कोल्हापूर जिल्ह्याच्या वनस्पती कोशामध्येही नोंद नव्हती, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासाठी या वृक्षाची प्रथमच नोंद होत आहे.
टाऊन हॉल उद्यानात विविध प्रजातींचे ९४ प्रकारचे वृक्ष पाहायला मिळतात. येथील हे पायमोज्याचे वृक्ष बहरल्याचे निसर्गप्रेमी धनश्री भगत आणि परितोष उरकुडे यांच्या लक्षात आले. त्यांनी या फुलांची छायाचित्रे डॉ. ऐतवडे यांना पाठविले. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन या झाडाचीच ही फुले फुलल्याचे स्पष्ट केले. पळस कुळातील हा वृक्ष मुळचा लॅटिन अमेरिकेतील पेरु या देशातील असून व्हेनिझुएला, ब्राझील, साल्वाडोर या देशांतील जंगलामध्ये १०० फुटांपेक्षाही जास्त उंच वाढतो. याचे शास्त्रीय नाव मायरोझायलॉन बालस्यामम आहे. याला पेरु, बाल्सम, टोलू बाल्सम अशी इंग्रजी नावे आहेत. दक्षिण अमेरिकेतील काही देशांमध्ये 'सँनटोस् महोगनी' अशीही या वृक्षाची ओळख आहे.
पायमोज्याचे झाड म्हणून ओळख
याच्या शेंगा पायमोज्याच्या आकाराच्या असल्याने यास ‘पायमोज्याचे झाड’ म्हणतात. शेंग हेलिकॉप्टरसारखी गरगरत येऊन जमिनीवर पडते. हा वृक्ष मुंबई, बेंगलोर येथील लालबाग उद्यान, निलगिरी हिल्समधील कलगार उद्यान आणि दक्षिण भारतातील काही उंच भागांमध्ये आढळतो. हा वृक्ष सदाहरित आहे. खोडामध्ये रेझीन असून त्यास तुळशीच्या पानांसारखा वास येतो. पाने संयुक्त आणि एकआड एक असतात. फुलोरे पानांच्या बेचक्यात येतात. फुले लहान आणि पिवळसर पांढऱ्या रंगाची असतात. याची एक पाकळी मोठी असून उर्वरित चार नाजूक व लहान असतात. फळ शेंगाधारी असून पंखधारी शेंगांच्या टोकाला एकच बी असते.
“जिल्ह्यात अनेक वृक्ष नव्याने नोंद होत आहेत. यातील बहुसंख्य विदेशी आणि दुर्मिळ आहेत. अशा वृक्षांना वारसा वृक्षांचा दर्जा दिला गेला पाहिजे. यामुळे या दुर्मिळ वृक्ष संपदेचे जतन आणि संवर्धन होईल.” - डॉ. मकरंद मोहनराव ऐतवडे