अपक्षांच्या आडून मतविभाजनाची खेळी बिघडवते दिग्गजांचे गणित; ‘कोल्हापूर’, ‘हातकणंगले’त २९ अपक्ष रिंगणात
By राजाराम लोंढे | Published: April 24, 2024 01:48 PM2024-04-24T13:48:50+5:302024-04-24T13:49:32+5:30
तालुकानिहाय उमेदवार..जाणून घ्या
राजाराम लोंढे
कोल्हापूर : पराभूत होणार हे माहिती असूनही २५ हजार रुपयांची अनामत रक्कम भरून अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची जोखीम पत्करण्यामागे राजकीय जोडण्या दडलेल्या असतात. अपक्षांच्या आडून मतविभाजन करून दिग्गजांचे विजयी गणित बिघडविण्याची रणनीती खेळली जात आहे. या निवडणुकीत ‘कोल्हापूर’मधून विविध पक्षांचे ९, तर १४ अपक्ष व ‘हातकणंगले’मधून विविध पक्षांचे १२ आणि १५ अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्षांच्या उमेदवारांबरोबरच अपक्षही रिंगणात असतात. अपक्ष रिंगणात उतरविणे, हा राजकीय डावपेचाचा भाग असतो. ग्रामपंचायत निवडणुकीत गल्ली, भावकीत बंडखोरी करायला लावून विजय सोपा करण्याची रणनीती आखली जाते. विधानसभा निवडणुकीत आपणाला मतदान न होणाऱ्या विभागात अपक्षाला रसद पुरवून रिंगणात उतरवले जाते. लोकसभा निवडणुकीतही कोणता तालुका आपणाला पोषक नाही, याची चाचपणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच केली जाते.
‘कोल्हापूर’ मतदारसंघात नऊ तालुके व कोल्हापूर शहर येते. यामध्ये राधानगरी, गगनबावडा तालुकेवगळता सर्वच ठिकाणचे उमेदवार आहेत. करवीर तालुक्यातील सर्वाधिक आठ, तर कोल्हापूर शहरातील ७ उमेदवार रिंगणात आहेत.
‘हातकणंगले’मध्ये सहा तालुके व इचलकरंजी शहर येते. येथे इचलकरंजी शहरवगळता सर्व तालुक्यातील उमेदवार आहेत. हातकणंगले तालुक्यातून सर्वाधिक ९, जण तर मतदारसंघात नसलेल्या करवीर तालुक्यातील दोन उमेदवार आहेत. एकूणच अपक्षांची संख्या आणि त्यामागील राजकीय डावपेच पाहिले तर दिग्गजांचे गणित बिघडविणार हे निश्चित आहे.
जातीय समीकरण
‘कोल्हापूर’ व ‘हातकणंगले’ मतदारसंघातील प्रमुख राजकीय पक्षांसह रिंगणात असलेले उमेदवार विविध जातींचे आहेत. मतविभाजनातील प्रमुख कारणांपैकी हे एक असून, त्याचा फटका नेमका कोणाला बसणार, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.
आजऱ्यात लाखभर मते अन तीन उमेदवार
जिल्ह्यात गगनबावड्यानंतर आजरा तालुका छोटा आहे. जिल्हा परिषदेचे तीन मतदारसंघ तेही तीन विधानसभा मतदारसंघात विभागलेले आहेत. जेमतेम लाखभर मते, पण तेथून लोकसभेचे तीन उमेदवार रिंगणात आहेत.
‘माने’ आडनावाचे चौघे रिंगणात
उध्दवसेनेचे सत्यजित पाटील - सरुडकर व पारगावचे सत्यजित पाटील हे अपक्ष असे नावात साधर्म्य असणारे उमेदवार ‘हातकणंगले’त आहेत. त्याचबरोबर ‘माने’ हे आडनाव असलेले चौघेजण आहेत. गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील अरविंद माने हे दोन्ही मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत.
तालुकानिहाय उमेदवार असे
कोल्हापूर :
आजरा -३, चंदगड-१, भुदरगड-१, गडहिंग्लज -१, कागल-१, पन्हाळा -१, करवीर-८, कोल्हापूर शहर-७
हातकणंगले :
शिराळा - २, वाळवा - ५, शाहूवाडी - २, पन्हाळा - ३, शिरोळ - ४, हातकणंगले - ९, करवीर-२