प्रमुख मागण्या मान्य; गेल्या दीड महिन्यापासून सुरु असलेला अंगणवाडी सेविकांचा संप अखेर मागे
By विश्वास पाटील | Published: January 25, 2024 05:23 PM2024-01-25T17:23:19+5:302024-01-25T17:23:33+5:30
कोल्हापूर : अंगणवाडी कर्मचारी कृति समितीच्या नेत्यांची महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव आणि महिला बाल विकास आयुक्त ...
कोल्हापूर : अंगणवाडी कर्मचारी कृति समितीच्या नेत्यांची महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव आणि महिला बाल विकास आयुक्त रुबल अग्रवाल व अन्य आधिकाऱ्यांसोबत विस्तृत मीटिंग झाली. त्यामध्ये प्रमुख मागण्या मान्य झाल्याने ४ डिसेंबर पासून सुरु असलेला संप मागे घेण्यात आला.
वेतनश्रेणी करण्याची मुख्य मागणी मात्र मान्य झाली नाही. संपच्या काळातील मानधनबाबतही निर्णय झाला नाही..त्यामुळे संप मागे घेतल्यावर कर्मचाऱ्यामध्ये नाराजी व्यक्त झाली. बैठकीत एम. ए. पाटील, शुभा शमीम,दिलीप उटाणे,कमल परुळेकर,भगवान देशमुख,जीवन सुरुडे, जयश्री पाटील आदींनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली.
मान्य झालेल्या मागण्या अशा
- शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या साठी पेंशन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे मान्य केले असून लवकरात लवकर प्रस्ताव मंत्रीमंडळात मंजुरीसाठी पाठवला जाईल असे सांगितले. तसेच कृति समितीच्या वतीने पेंशन योजने बाबत ठोस सुधारणांचा लेखी प्रस्ताव देण्यात आला.
- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ग्रॅच्युईटी देण्याचे मान्य केलें.
- मोबाइल तात्काळ देणार.
- मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्ण अंगणवाडी सेविका पदाचे आदेश त्वरित देणार.
- संपकाळात कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे मान्य केले. सर्व कारवाई आदेश मागे घेणार असे मान्य केले
- संप काळ करोना काळातील राहिलेल्या दिवाळी व उन्हाळी सुट्टी मध्ये समायोजित करण्याविषयी सकारात्मक विचार करणार.
- १०वी पास मदतनिसांना सेविका पदी थेट नियुक्ती देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.
सर्व चर्चा सचिव आणि आयुक्त यांच्याशी झाली. कृती समितीला ही चर्चा आशादायक वाटली. त्याचप्रमाणे महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिनांक ५/१२/२०२३ रोजी झालेल्या मीटिंग मधे दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आशा सेविकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आल्या नंतर त्याचें अवलोकन करुन अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा विषय मंत्री मंडळात मांडण्यात येईल.
शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे तसेच ग्रॅच्युइटी व पेन्शनचा महत्वाचा निर्णय होत असल्याने अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने संप मागे घेतला. बैठकीला एम. ए. पाटील, ॲड. निशा शिवूरकर, शुभा शमीम , दिलीप उटाणे, दत्ता देशमुख, सुवर्णा तळेकर, आप्पा पाटील, आरमायटी इराणी, ॲड. माधुरी क्षीरसागर हे कृति समितीचे सदस्य उपस्थित होते.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या एकजूट आणि संघर्षामुळे आपल्या महत्वाच्या मागण्या मान्य होत आहेत. मानधनवाढीबाबत लवकरच निर्णय होईल अशी अपेक्षा करुया अशी प्रतिक्रिया संघटनेच्यावतीने व्यक्त झाली.