रंगपंचमीदिवशी शिवाजी विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दिवसभर ठेवले कोंडून
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 11:43 AM2023-03-13T11:43:30+5:302023-03-13T11:45:50+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना रविवारी रंगपंचमी साजरी करण्यास विद्यापीठ प्रशासनाने बाहेर जाऊ दिले नाही. इतकेच ...
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना रविवारी रंगपंचमी साजरी करण्यास विद्यापीठ प्रशासनाने बाहेर जाऊ दिले नाही. इतकेच नाही तर चहा आणि नाश्ता करण्यासाठी बाहेर जाऊ दिले नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांना कोंडून ठेवल्याचा आरोपही काही विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकरणाचा सोशल मीडियावरून त्यांनी निषेध नोंदविला आहे.
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहे आहेत. दोन्हींमध्ये सुमारे अडीच हजार विद्यार्थी राहत आहेत. विद्यापीठ प्रशासनाने वसतिगृह परिसरात रंगपंचमी खेळण्यास आणि पाण्याचा अपव्यय न करण्याची नोटीस चार दिवसांपूर्वी दिली होती. रविवारी सकाळी सात वाजल्यापासूनच संपूर्ण विद्यापीठ परिसरातच रंगपंचमी साजरी करण्यास बाहेर पडण्यापासून सुमारे दीडशे विद्यार्थ्यांना कारवाई करण्यात येईल असे सांगून रोखण्यात आले.
इतकेच नव्हे, तर वसतिगृहांनाही कुलूप घालून विद्यार्थ्यांना बाहेरही पडू दिले नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यापीठ प्रशासनाने या विद्यार्थ्यांना विशेषत: विद्यार्थिनींना चहा आणि नाश्ता करायलाही बाहेर पडू दिले नसल्याची तक्रार या विद्यार्थ्यांनी केली आहे.
वसतिगृहाबाहेर रंगपंचमी खेळण्यासाठी सुमारे दीडशेहून अधिक विद्यार्थी जाणार होते, मात्र सुरक्षा रक्षकांनी मेन गेटला कुलूप लावून एकालाही बाहेर सोडले नव्हते. चहा आणि नाश्ता करण्यासाठी बाहेर जाऊ दिलेले नाही. - वैभव पाटील, मुलांचे वसतिगृह