दत्त दालमिया कारखान्याची ऊस वाहतूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2022 11:12 PM2022-10-26T23:12:42+5:302022-10-26T23:13:34+5:30
Kolhapur News: दत्त (दालमिया भारत शुगर) या खासगी साखर कारखान्याने यंदा गळीत हंगामाची पहिली उचल ३०७५ रूपये जाहिर करून गळीत हंगामास बुधवारी (दि.२६) सुरूवात केली. परंतू ही उचल मान्य नसलेच्या निषेधार्थ पन्हाळा तालुका स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याची ऊस वाहतुक रोखली.
- सरदार चौगुले
आसुर्ले पोर्ले - विविध संघटनेच्या मागणीनुसार आसुर्ले-पोर्ले (ता.पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील दत्त (दालमिया भारत शुगर) या खासगी साखर कारखान्याने यंदा गळीत हंगामाची पहिली उचल ३०७५ रूपये जाहिर करून गळीत हंगामास बुधवारी (दि.२६) सुरूवात केली. परंतू ही उचल मान्य नसलेच्या निषेधार्थ पन्हाळा तालुका स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याची ऊस वाहतुक रोखली. कारखाना गेटसमोर ऊसाने भरून आलेल्या ट्रॅक्टर चालकांच्या अंगावर धावून जात कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर परत पाठवले. पहिल्या उचलीबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत कोणीही ऊस तोड घेऊ नये असे आवाहन संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांना करण्यात आले.
दालमिया प्रशासनाने एफआरपीची पहिले उचल जाहिर केल्याशिवाय कारखाना सुरू करू नये अशा आशयाचे निवेदन जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनेने प्रशासनाला दिले होते.आज बुधवारी सकाळी दालमिया प्रशासनाने एफआरपीची पहिली उचल ३०७५ रूपये जाहिर करून गळीत हंगामाचा श्रीगणेशा करण्याच्या तयारीत असताना, अपेक्षेप्रमाणे दालमियाने पहिली उचल जाहिर न केल्याच्या निषेधार्थ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याकडे ऊसाने भरून आलेल्या पाच वाहनांना गेट समोर अडवले आणि त्यांना परतीचा मार्ग दाखवला. काही कार्यकर्त्यांनी तर त्याचं ट्रॅालीतील ऊसाचा बुडका उपसून चालकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला.
शासनाच्या यावर्षीचा रिक्वरीचा बेस धरून दालमिया प्रशासन पहिली उचल देत असेल तर ती आम्हाला अमान्य आहे.त्यांना गत हंगामातील दोन्ही एफआरपीचा सुवर्ण मध्य साधून पहिली उचल जाहिर करावी.जोपर्यंत स्वाभीमानी संघटना आणि दालमिया प्रशासन यांच्या एफआरपीबाबत योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत कोणी तोडणी स्वीकारू नये असे तालुका युवा अध्यक्ष विक्रम पाटील यांनी कारखानास्थळी केले.
यावेळी तालुका अध्यक्ष रामराव चेचर, दगडू गुरवळ, उमेश शेलार, बाबूराव शेवडे, शिवाजी शिंदे, नारायण पाटील, रणजीत पानारी, दिपक लोकरे, बाळू कोठावळे, महादेव झेंडे (पडळ), विक्रम पाटील (वाघवे) नाथाजी पाटील (चव्हाणवाडी) आदींसह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.