धैर्यशील मानेंनी आता 'मीच गद्दार' अशी टॅगलाईन ठेवावी, खासदार संजय राऊतांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 01:01 PM2023-03-03T13:01:24+5:302023-03-03T13:02:06+5:30
शिवसेना संपविण्यासाठी यापूर्वी अनेक प्रयत्न झाले; पण कोणालाही ते जमले नाही. तर या रंगा-बिल्लाला काय जमेल ?
इचलकरंजी : मूळ शिवसेना ही जनमाणसांची आहे यातून बाहेर गेलेले ४० गद्दार महाराष्ट्राचे दुश्मन आहेत. त्यांच्या पुढील पिढ्यांना ही गद्दार म्हणून कायम कपाळावर कलंक राहणार आहे. जनताच त्यांचा सर्जिकल स्ट्राईक करेल. धैर्यशील माने म्हणजे मीच खासदार ही टॅगलाईन बदलून आता मीच गद्दार अशी ठेवावी लागेल. आता तुम्हीच त्यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन खासदार संजय राऊत यांनी केले.
येथील घोरपडे नाट्यगृहात झालेल्या शिवगर्जना मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उपनेते तथा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर व प्रवक्ते लक्ष्मण हाके यांची प्रमुख उपस्थिती होती.
राऊत म्हणाले, शिवसेना संपविण्यासाठी यापूर्वी अनेक प्रयत्न झाले ; पण कोणालाही ते जमले नाही. तर या रंगा-बिल्लाला काय जमेल ? यांनी शंभर वेळा पुनर्जन्म घेतला तरी ते शक्य नाही. शिवसेना ही एक ठिणगी आहे. बाळासाहेबांनी आयोगाला विचारून ही शिवसेना काढली नव्हती. त्यामुळे बाळासाहेबांना अपेक्षित शिवसेना टिकवून ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी खंबीरपणे लढा द्यावा. सन २०२४ ला निवडणुकीनंतर यांना जनभावना कळेल. मुख्यमंत्री व पंतप्रधान कोण असेल, तेही कळेल. त्यावेळी मग ईडी आणि सीबीआय कसे असते, ते बघू.
खासदार माने यांच्यावर टीका करत यांचे नाव धैर्यशील कोण ठेवले ? यांना कोठेच धैर्य नसते ? कदाचित बीजेपी ही त्यांना उमेदवारी देणार नाही. खोकेपटू मधील हाही मोठा खेळाडू आहे, असे खात्रीलायकरीत्या समजले आहे. इचलकरंजीतील जनभावना पाहता यांना बाहेर पडता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. अशा गद्दारांना तुम्हीच धडा शिकवा.
प्रवक्ते हाके म्हणाले, खऱ्या शिवसेनेच्या पाठीमागे महाराष्ट्रातील जनता आहे. या सहानुभूतीचे मतात रुपांतर करण्यासाठी ही शिवगर्जना यात्रा आहे. आम्ही जनतेला हाक देण्यासाठी आलो आहे. आता जिंकेपर्यंत लढायचं. दुधवडकर यांनी, निष्ठा, प्रेम आणि आदेश मानणाऱ्या शिवसैनिकांचे उदाहरण देत असेच शिवसैनिक बाळासाहेबांना अपेक्षित आहेत. ते आपण बनून दाखवूया, असे आवाहन केले.
जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, माजी आमदार सुजित मिणचेकर, आदींची भाषणे झाली. शहर अध्यक्ष सयाजी चव्हाण यांनी स्वागत केले. यावेळी साताप्पा भवान, मधुकर पाटील, आनंद शेट्टी, बाजीराव पाटील, मंगल चव्हाण, मेहबूब मणेर, विजय देवकर, अस्लम खलिफा, इस्माईल शेख, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अण्णासाहेब बिलुरे यांनी सूत्रसंचालन व महादेव गौड यांनी आभार मानले.
हिम्मत असेल, तर आता निवडणुका घ्या
खरचं तुम्हाला जनतेचा कौल बघायचा असेल, तर आताच निवडणुका घ्या. किमान कोल्हापूर आणि मुंबई महापालिकेच्या तरी निवडणुका घेऊन बघा. तुम्हाला खरी शिवसेना कळेल, असे आव्हान खासदार राऊत यांनी दिले.
जल्लोषी स्वागत
शहरात शिवतीर्थ जवळ शिवसेना ठाकरे गटासह महाविकास आघाडी घटक पक्षांच्या वतीने खासदार राऊत यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यामुळे आपण भारावून गेल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.